भिसी : भिसीला प्रत्येक शनिवारी बाजार भरतो, त्याप्रमाणे आज पोळ्याचा बाजार भरलाय; परंतु धान्य विकणारे शेतकरी व व्यापारी दिसत नसल्याने आज धान्य विक्रेते अडचणीत सापडले आहेत. भिसीचे व्यापाऱ्यांचे सोमवारी शंकरपूरला, मंगळवारी जांभूळघाटला, बुधवारी नेरीला, शुक्रवारी चिमूरला, शनिवारी भिसी व रविवारी कान्पाला असे सातही दिवसांचे वेळापत्रक असते. या व्यापाऱ्यांच्या भरवशावरच वरील गावांतील बाजार भरतो; परंतु बाजाराचा आत्मा असलेला धान्य बाजार बंद असल्याने धान्य विकणारे व्यापारी संकटात सापडले आहेत.
चिमूर तालुक्यात भिसीचा बाजार प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्यात भाजीपाला म्हटला की, नागपूरला जाणारे भिसीतून भाजीपाला विकत घेतात. चिमूरपेक्षा भिसीत भाजीपाला स्वस्त मिळतो, असा समज आहे. आता कोरोनाची लाट ओसरली तरी केवळ भाजीपाला विकणाऱ्यांचाच बाजार भरतो. दुरूवरून विक्रेते भाजीपाला विकायला आणतात.
या श्रावण महिन्यात अनेक सण येतात. सणांचा महिना म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशा सणासुदीच्या दिवसात शेतकरी आपले धान्य बाजारात विकायला आणतो व सण साजरा करतो. पोळा बैलांचा, तसेच धान्य बाजारच बंद असल्याने पोळा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर पडला आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने धान्य बाजार सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी धनराज खेरे, विलास बानकर, दिवाकर घाटूरकर या व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी केली आहे.