चंद्रपूर : सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना काही मंडळांकडून आजही मंडळाच्या जुन्या परंपरा जोपासल्या जात आहेत. काही मंडळे आपल्या वैशिष्टयपूर्ण उपक्रमामुळे आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.चंद्रपूर येथील गोलबाजारातील एका चाळीत साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाला १०८ वर्षांची परंपरा आहे. ३१ आॅगस्ट १९०८ मध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्याही आधीपासून येथे सार्वजनिक स्वरुपात श्रीची स्थापना केली जाते. लोकमान्य टिळकांच्या विचाराने प्रेरित होऊन बालगुंडजी पंडित यांनी १९०८ मध्ये सर्वप्रथम येथे श्रींची स्थापना केली होती. या ठिकाणी टेलरिंगची दुकाने आहेत. या दुकानांच्या चाळीतच गणरायाची स्थापना होते. या गणेशोत्सवासाठी तब्बल १० दिवस ही दुकाने स्वमर्जीने दुकानदार बंद ठेवतात. ही परंपरा आजही जोपासली जात आहे. भजन आणि भोजन हे जणू या मंडळाचे ब्रिदच आहे. दहाही दिवस रात्री या ठिकाणी भजन केले जाते. दिवसभर काबडकष्ट केलेले गोलबाजारातील दुकानदार रात्री भजनात सहभागी होतात. विशेष म्हणजे, या मंडळाने एक्का (अखंड टाळ) ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. यासोबत गणरायाचे विसर्जनही अतिशय साधे म्हणजे भजन-कीर्तन गातच केले जाते. ढोलताशे, बॅण्ड संदल या वाद्यांना मंडळाने दूर ठेवले आहे. वर्षभरात कुणाचे निधन झाले असेल तर मंडळाच्या दर्शनी भागातच त्यांचे श्रध्दांजली फलक लावले जाते. विशाल आक्केवार मंडळाचे सध्या अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष प्रभाकर आक्केवार तर सचिव गोटू दिकोंडवार आहेत.ताडाळी येथील गोपानी आयरन अॅण्ड पॉवर (ईं) प्रा.ली या कंपनीच्या वसाहतीतही गणरायाची स्थापना होते. कंपनीतील बरेच कामगार व अधिकारी येथे राहतात. कामाला श्रध्देची जोड देऊन दरवर्षी कामगार व अधिकाऱ्यांतर्फे हा उत्सव साजरा होतो. गणेशाच्या मूर्तीजवळ एक दानपेटी ठेवण्यात येते. दरवर्षी गणेश भक्तांच्या देणगीतून जमा झालेली रक्कम सामाजिक जाणीवेतून जवळच्या अनाथाश्रमात तसेच गोशाळेला देणगीच्या रूपात देण्यात येते. मंडळाने ही परंपरा आजही जोपासली आहे.चंद्रपूरचा राजा जटपुरा गणेशोत्सव मंडळ आपल्या वेगळ्या वैशिष्टयामुळे जिल्ह्यात प्रसिध्द आहे. दरवर्षी डेकोरेशन करताना देशातील विविध प्रसिध्द वास्तूंचे देखावे तयार केले जाते. यंदा मंडळाने फत्तेपूर सिखरीच्या बुलंद दरवाजासह गाभाऱ्यात राजवाड्याची अत्यंत सुंदर व मनमोहक सजावट करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)
‘ती’ मंडळे आजही जोपासताहेत परंपरा !
By admin | Published: September 24, 2015 1:16 AM