घुग्घुस : दोन महिन्यांपूर्वी उसगाव रस्त्यावरील गुप्ता कोल वाॅशरीज सुरू झाल्यापासून कोलवाॅशरीजच्या कोळसा भरलेले व खाली ट्रक उसगावच्या रस्त्यावर पार्किंग करीत असल्याने रस्त्यावरील रहदारीला अडचण निर्माण झाला आहे. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
रस्त्यावरील पार्किंग बंद करून कोळसा वाॅशरीजने पार्किंग व्यवस्था आपल्या हद्दीत करावी, अशी उसगावच्या सरपंच निविता ठाकरे यांनी वारंवार पत्र देऊन केली. मात्र, पत्रांची दखल घेतली नाही. तात्काळ रस्त्यावरील पार्किंग बंद करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या क्षेत्रातील विविध कोल वाॅशरीज मागील अनेक वर्षांपासून बंद होत्या. त्यापैकी उसगाव रस्त्यावरील गुप्तता कोल वाॅशरीज दोन महिन्यांपासून सुरू झाली. दरम्यान, वाॅशरीजच्या प्रदूषणामुळे व कोळसा वाहतुकीच्या वाहनामुळे आजूबाजूच्या शंभर एकर शेत जमिनीवरील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या वाॅशरीजच्या कोळसा वाहतुकीच्या वाहनांची पार्किंगसाठी उसगाव-शेणगाव रस्त्याचा उपयोग होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून इतर वाहनांच्या रहदारीला अडचण निर्माण झाली व अपघाताची भीती निर्माण झाली आहे, असे सरपंच ठाकरे यांनी म्हटले आहे.