२६९ वाहनांची बुकिंग : ६३ नक्षल प्रभावित मतदान केंद्र, २ हजार ७९८ पोलिसांची ड्युटी चंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी १५ पंचायत समित्याअंतर्गत ६ हजार ४०० मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना इव्हीएम मशिनवर मतदारांचे मतदान कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चंद्रपूरचे प्रशिक्षण जिल्हा स्टेडियम येथील बॅडमिंटन सभागृहात देण्यात आले. जिल्ह्यातील १७८ मतदान केंद्र संवेदनशील समजले जातात. तर पाच तालुक्यांमध्ये ६३ केंद्र नक्षल प्रभावित आहेत. ही निवडणूक पार पाडण्यासाठी १५ पंचायत समित्याअंतर्गत १५ निवडणूक पथके गठित करण्यात आली आहेत. त्यानुसार, पंचायत समित्यानिहाय १ हजार ६०० मतदान केंद्राध्यक्ष आणि ४ हजार ८०० मतदान अधिकाऱ्यांना रविवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. त्यामध्ये मतदान करण्यास आलेल्या मतदारांना निवडणूक ओळख पटविण्यापासून मतदान चिठ्ठी देणे, मतदाराने मतदान केल्यानंतर इव्हीएम मशिनकडे लक्ष ठेवणे आदी सूचना देण्यात आल्या. तसेच मतदारांकडे फोटो ओळखपत्र नसल्यास फोटो असलेली मतदार चिठ्ठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबतही मतदान केंद्राध्यक्षांना मार्गदर्शन करण्यात आले.मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता त्यांच्या पोलिंग पार्ट्या तयार करून त्या-त्या पार्ट्यांचे साहित्य वाटप केले जाणार आहे. त्यांची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्जुन चिखले यांच्याकडे तालुक्यातील निवडणूक अधिकाऱ्यांनी एसटी बसेस, शासकीय व खासगी जीप, पोलीस कुमक आणि इव्हीएम मशिनची मागणी नोंदविली आहे. त्यामध्ये बल्लारपूर, मूल, सिंदेवाही येथील मागणी न आल्याने त्यांचे काम रेंगाळले आहे. (प्रतिनिधी) १८० एसटी बसेस लागणारमतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या पोहोचविण्याकरिता १८० एसटी बसेस लागणार आहेत. काही केंद्रांवर जाण्याकरिता एस.टी. बस उपयुक्त नाही. ते लक्षात घेऊन ९६ जीपची गरज पडणार आहे. त्यामध्ये पाच खासगी जीप बुक करण्यात आल्या आहेत. मतदान साहित्यासाठी नऊ ट्रकची मागणी करण्यात आली आहे. या सर्व वाहनांमध्ये पोलिसांच्या वाहनांचा समावेश नाही. १७८ संवेदनशील मतदान केंद्रजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ११ लाख ५७ हजार ७१९ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यांच्याकरिता १ हजार ४४९ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी १७८ केंद्र संवेदनशील आहे. तर जिल्हा निवडणूक अधिकारी आशुतोष सलील यांनी ६३ केंद्र नलक्ष प्रभावित घोषित केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ३२ केंद्र जीवती तालुक्यातील आहेत. गोंडपिपरी १४, राजुरा १०, कोरपना ४ आणि पोंभुर्णा तालुक्यात ३ केंद्र नलक्ष प्रभावित आहेत. १ हजार ४४९ मतदान केंद्रांवर २ हजार ७९८ पोलिसांच्या ड्युटी लावण्यात आल्या आहेत.
६ हजार ४०० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
By admin | Published: February 13, 2017 12:34 AM