लोकमत न्यूज नेटवर्क
राजेश मडावीचंद्रपूर : बांबू मिशन अंतर्गत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रत्येकी २० याप्रमाणे ६० विद्यार्थी संबंधीत विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात (बीआरटीसी) प्रारंभी पायाभूत प्रशिक्षण घेणार आहेत. विशेष म्हणजे राहुरी विद्यापीठातील बी़ टेक व एम़ टेक करणाऱ्या चार विद्यार्थ्यांनीही निवासी प्रशिक्षणाकरिता तयारी दर्शविली़ त्यामुळे बदलत्या शैक्षणिक स्पर्धेतही रोजगाराभिमुख बांबू मूल्यवर्धन अभ्यासक्रमाचा परिघ आता विस्तारू लागला आहे.राष्ट्रीय वन धोरणाअंतर्गत बांबू वृक्षासंदर्भात सरकारने नवे धोरण तयार केले. तेव्हापासून बांबू मूल्यवर्धन हा विषय आता विद्यापीठस्तरावरही अभ्यासाकरिता आकर्षणाचा विषय झाला आहे. पारंपरिक शिक्षणाच्या पलिकडे जाऊन रोजगाराभिमुख होण्यासाठी बांबू प्रशिक्षण कितपत उपयोगी ठरेल, असा प्रश्न काही शिक्षणतज्ज्ञ आजही उपस्थित करीत आहेत़ आधुनिक तंत्रज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असताना बांबू मूल्यनिर्धारण या विषयावर मूलगामी अभ्यासक्रम नाहीत़ महाराष्ट्रा तरी या विषयाला काही मर्यादा आहेत, अशी शंकाही विचारली जात आहे़ या पार्श्वभूमीवर चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राकडे विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचा पाहण्याचा बदलेला दृष्टिकोन नवी उभारी देणारा ठरू शकतो़ बांबू मिशन अंतर्गत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात प्रत्येकी २० याप्रमाणे ^६० विद्यार्थ्यांनी बांबू पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. या विद्यार्थ्यांना संबंधीत विद्यापीठाच्या संशोधन केंद्रात बांबू प्रशिक्षण मिळेलच. मात्र, या विषयाचे पायाभूत ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती राहुरी कृषी विद्याठाचे संशोधन केंद्रप्रमुख आर. बी. नजन यांनी दिली़ तिन्ही विद्यापीठांतील पहिल्या बॅचमध्ये प्रत्येकी २० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे़ या विद्यार्थ्यांना बांबूपासून तयार होणाऱ्या १२५ पेक्षा अधिक वस्तूंचे प्रशिक्षण देण्यात येईल़ विज्ञान अभ्यास शाखेतील हुशार विद्यार्थी प्रामुख्याने वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शाखेलाच प्राधान्य देण्याची मानसिकता कायम असताना बांबू प्रशिक्षणाकडे करिअर म्हणून पाहत आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत हा अभ्यासक्रम विद्यार्थीप्रिय होण्याची शक्यता बांबू तज्ज्ञांनी व्यक्त केली़वनमंत्र्यांची आश्वासन पूर्तीराज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबू मिशन अंतर्गत पुणे, अमरावती व राहुरी येथे बांबू विषयावर आधारीत अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती. एवढेच नव्हे तर वनमंत्रालयाने स्वत:हून कृषी विद्यापीठांकडून यासंदर्भात मागविला होता़ दरम्यान हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी तातडीने मंजुरी देऊन तीनही विद्यापीठांना प्रत्येकी ३३ लाख २१ हजारांचा निधी प्रदान केला आहे.रोजगाराभिमुख बांबू मूल्यवर्धनाचे आकर्षणपारंपरिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन ‘करिअर’चा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बांबू अभ्यासक्रमाला पसंती देत असल्याचे चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून दिसून आले़ या केंद्रात सर्व अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिले असून बांबू प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी मिळणार आहेत.