लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पंचायती, नगर परिषदांच्या शाळांची खासगी शाळांशी सुरु असलेल्या स्पर्धेला आणखी गती आली आहे. राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केलेल्या पालकमंत्री संगणक प्रशिक्षण प्रयोग शाळेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रशिक्षणाच्या बसेस रवाना करण्यात आल्या आहेत.यावेळी आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी राम गारकर, सीएमफेलो निकीता निंबाळकर, ज्युबिली हायस्कूलचे प्राचार्य काळे उपस्थित होते.राज्यातील ही पहिलीच आॅनव्हील संगणक प्रशिक्षण चळवळ आहे. टाटा ट्रस्टच्या मदतीने शाळाशाळांमधील मुलांना याचा लाभ मिळणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता स्थानिक ज्युबिली हायस्कूलमध्ये या योजनेचा प्रत्यक्ष प्रारंभ झाला. टाटा ट्रस्टच्या वतीने यासंदर्भातील करार करण्यात आला असून विद्या प्रतिष्ठान पुणे या संगणक तंत्रज्ञान संस्थेकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या बसमधील संगणकाच्या माध्यमातून जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतीच्या ९५१ शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संगणक हाताळण्याच्या प्राथमिक बाबी शिकविण्यात येणार असून प्रत्येक शाळेत एक तास हे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. अशाप्रकारे प्रत्येक शाळेमध्ये चार भेटी दिल्या जाणार आहेत. या मुलांना डिजिटल शाळेअंतर्गत यापूर्वीच संगणकाची तोंड ओळख झाली असून त्यांना संगणकासंदर्भातील अधिक माहिती या प्रशिक्षणातून दिली जाणार आहे. सुरुवातीला चार तालुक्यांमध्ये हा उपक्रम १ नोव्हेंबरपासून पहिल्या ६ तालुक्यात प्रशिक्षण सुरु होणार आहे. यामध्ये चंद्रपूर, बल्लारपूर, जिवती, मुल, पोंभूर्णा व गोंडपिपरी तालुक्याचा समावेश आहे.जि.प. शाळा दर्जेदार व्हाव्यात - मुनगंटीवारआजच्या पालकमंत्री संगणक प्रयोगशाळेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ झाल्याबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा दर्जेदार व्हाव्यात यासाठी, हा महत्वपूर्ण निर्णय असून उद्याचे संगणक अभियंते आणि संगणकासंदर्भातील ज्ञान असणारे कुशल मनुष्यबळ निर्मितीला यातून सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हा उपक्रम जिल्हा परिषद, महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पालकमंत्री संगणक प्रयोगशाळेच्या प्रशिक्षणाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:30 AM
जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पंचायती, नगर परिषदांच्या शाळांची खासगी शाळांशी सुरु असलेल्या स्पर्धेला आणखी गती आली आहे.
ठळक मुद्देसहा तालुक्यांचा समावेश : महाराष्ट्रातील पहिली आॅनव्हील संगणक चळवळ