महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी वनव्यवस्थापन समिती गुंजेवाही व सहायक वनसंरक्षक रामेश्वरी बोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन अंबिका देवस्थान परिसरात घेण्यात आले.
सदर दोन दिवसीय चाललेल्या प्रशिक्षणात प्रशिक्षक म्हणून शालू भर्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी जंगलात सहज उपलब्ध असलेल्या मोहफूल, कवट, अंबाडी तसेच अनेक प्रकारच्या वनस्पती फुलांपासून विविध प्रकारचे लोणचे, सरबत, चटण्या बनवायला पाहिजे, असे सांगितले. त्याच्या माध्यमातून कसा आर्थिक विकास साधला जाऊ शकतो, याचे मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणात एकूण ५३ महिलांनी भाग घेतला. यावेळी सहायक वनसंरक्षक रामेश्वरी बोंगाडे यांनीही मार्गदर्शन केले. महिलांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आर्थिक समृद्धी साधण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.