लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने जिवती येथे जिल्हास्तरीय महिला लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद चंद्रपूरचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार अॅङ संजय धोटे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, बांधकाम व अर्थ सभापती संतोष तंगडपल्लीवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यावेळी उपस्थित होते.यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, आदर्श जिल्हा निर्माण करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महिला लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून ग्रामविकासाची कामे करावी. जिवती तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर तालुका ज्ञान संपन्न झाला पाहिजे. यासाठी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या सर्व सोईनिशी उत्तम दर्जाच्या तयार करा. शाळांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून संस्कारयुक्त शिक्षण तालुक्यातील बालगोपाळांना द्या. गरिबी अभ्यासाच्या आड येता कामा नये.जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी ग्रामविकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची सांगळ गरजेची आहे. ज्या क्षेत्रात महिला काम करतात त्या क्षेत्रात नक्कीच यश प्राप्त होते, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी केले. संचालन बाबा कोडापे तर आभार सुनिल जाधव यांनी मानले.
महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 10:03 PM