कामगारांत असंतोष : वेकोलि अध्यक्ष, सहप्रबंधक निदेशकांना निवेदन चंद्रपूर : माजरी क्षेत्रातील तब्बल १३८ कामगारांच्या क्षेत्राबाहेर बदल्या करण्यात आल्या. मागणी नसतानाही त्यांना क्षेत्राबाहेर हलविण्यात आले. त्यामुळे या कामगारांत संतापाचे वातावरण पसरले आहे. भारतीय मजदूर संघाद्वारे संलग्नित भारतीय कोयला खदान मजदूर संघाने शनिवारी वेकोलिचे अध्यक्ष, सहप्रबंधक निदेशकांना निवेदन दिले. निवेदनात संघाने म्हटले की, या गंभीर विषयावर वेकोलि प्रबंधनासोबत अनेकदा चर्चा करण्यात आली. वेकोलिचे कार्मिक निदेशक यांच्यासोबत १३ जुलै रोजी झालेल्या चर्चेत ज्या कामगारांना मागितल्यानुसार स्थान देण्यात आले नाही, या कामगारांची हजेरी लावण्यात येणार असल्याचे कबूल करण्यात आले होते. या बैठकीला वेकोलि प्रबंधनाचे महाप्रबंधकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मात्र, एक महिन्याचा कार्यकाळ लोटूनसुद्धा कामगारांना त्यांच्या मनाप्रमाणे नियुक्त्या देण्यात आल्या नाही. त्यामुळे हे कामगार कर्तव्त न बजावता वेकोलि प्रशासनाच्या चकरा मारीत आहेत. कामगारांच्या बदलीसंदर्भात वेकोलि प्रशासन उदासीन असल्याचा आरोपही युनियनने केला आहे. अनेक कामगारांचे पी.आर. ते टी.आर. फिक्सेशन थांबविण्यात आले. ते तातडीने करण्यात यावे, कामगारांची बदली त्यांच्या मनाप्रमाणे करावी, त्यांना रुजू करवून घ्यावे, या मागण्यांना निवेदनात समावेश होता. दरम्यान, वेकोलि कामगारांच्या समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन अध्यक्षांनी दिले. (शहर प्रतिनिधी)
वेकोलि कामगारांच्या क्षेत्राबाहेर बदल्या
By admin | Published: July 18, 2016 1:53 AM