गतिरोधकाविना सुसाट धावताहेत वाहने : बांधकाम विभाग व पोलिसांचेही दुर्लक्षसास्ती : महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व तेलंगाना या तीन राज्याच्या सीमेवरील राजुरा शहरातून या तिनही राज्याला जोडल्या जाणारे आंतरराज्यीय मार्ग जातात. मात्र शहरातून जाणाऱ्या या आंतरराज्य मार्गावर किंवा शहरातील विविध चौकात एकही गतिरोधक नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता असून नुकत्याच वणी येथे शाळकरी मुलांच्या बसला झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागच नव्हे तर पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.राजुरा शहरातून महाराष्ट्र-आंध्रप्रदेश व महाराष्ट्र- तेलंगाना असे दोन आंतरराज्य मार्ग जातात. या आंतरराज्य मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. राजुरा परिसरात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. सोबतच कोल वॉशरीज लगतच्या कोरपना तालुक्यात सिमेंट उद्योग व लगतच्या बल्लारपूर तालुक्यात पेपर मिल आहे. अशा औद्योगिक क्षेत्रामुळे व आंतरराज्य मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात राजुरा येथून वाहतूक सुरू असते. त्यात जास्तीत जास्त प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत असते. मोठमोठे ट्रक, टेलर, सिमेंट व फ्लॉय अॅश वाहून नेणारे कॅप्सूल, कोळसा वाहतूक करणारे दुरवस्थेत असलेले ट्रक, क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात भरलेल्या लाकडी काड्यांची वाहतूक करणारे ट्रक, प्रवाशी वाहतूक, दुचाकी वाहने अशा विविध प्रकारची वाहतूक शहरातील मुख्य मार्गाने होत असते. त्यामुळे सामान्य नागरिकाला रस्त्यावरुन चालताना जीव मुठीतच घेवून चालावे लागते. परंतु, अशी सगळी परिस्थिती असतानाही शहरातील मुख्य मार्गावर कोणत्याच ठिकाणी गतिरोधक नाहीत, ही एक आश्चर्याचीच बाब आहे. भरधाव वाहतुकीमुळे शहरातील मुख्य चौकात सामान्यांचे नाहक बळी सुद्धा गेलेले आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत. राजुरा शहरात विविध शाळा व महाविद्यालये आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेकोलिच्या स्कूल बस, खासगी स्कूल बस, व्हॅन, आॅटो अशा प्रकारचे विविध वाहने धावतात. शाळेच्या वेळात तर यांची रस्त्यावर लगबग असते. त्यातच ही मोठी वाहतूक सुद्धा सुरू असते. शहरातील मुख्य मार्गावर किंवा विविध चौकात गतिरोधक नसल्यामुळे या शाळकरीत विद्यार्थ्यांच्या वाहनांना अपघात झाल्यास वणी येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनास झालेल्या अपघातापेक्षाही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)
राजुरा शहरातील वाहतूक असुरक्षित
By admin | Published: February 22, 2016 1:14 AM