चंद्रपूर : घुग्घुस येथे कोळसा खदानीना लागून असल्याने गावांतील अनेकांनी कोळसा वाहतुकीकरिता ट्रक खरेदी केले. परंतु मोठमोठे ट्रान्सपोर्ट या व्यवसायात उतरल्याने स्थानिकांकडे एक-दोन गाड्या असलेल्या मालकांना कोळशाची वाहतूक करण्यासाठी कोणतेही काम मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. असाच प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी यंग चांदा ब्रिगेड तसेच मनसेच्या वतीने कोळशाची वाहतूक रोखत आंदोलन केले.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रवीश सिंह व यंग चांदा ब्रिगेडचे अब्रार व हनीफ मोहम्मद यांनी घुग्घुस येथून जवळच असलेल्या नायगाव कोळसा खाणीच्या चेकपोस्टजवळ येथील स्थानिक ट्रक चालक-मालकांना घेऊन धरणे आंदोलन केले.
स्थानिक पल्ला गाडीच्या ट्रक चालक मालकांना रोड सेलच्या डीओमध्ये काम देण्यात येत नाही. वेकोलि वणी क्षेत्राच्या नायगाव, मुंगोली, पैनगंगा या कोळसा खाणीतील रोड सेलच्या डीओमध्ये मोठे ट्रान्सपोर्टर टिप्पर गाडी लावून कोळसा उचलत आहेत. यात आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांतील ट्रक लावून कोळशाची उचल केली जात आहे. मोठ्या कंपन्यांना काम देण्यात आले आहे.
या कंपन्या स्थानिक ट्रक चालक-मालकांच्या गाड्या लावत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे स्थानिकांचा रोजगार हिरावल्याचे आरोप रविश सिंह यांनी केला. यापुढे स्थानिकांना रोजगार मिळाला नाही, तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविष सिंह व यंग चांदा ब्रिगेडचे सय्यद अब्रार, नकोडा माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद यांनी दिला आहे. आंदोलनात सानू सिद्दिकी, राहुल यदुवंशी, कलीम खान, सुनील चिलका, अनिल ठाकूर, सोनू ढेमरे, दिलीप पांडे, इब्राहिम खान, वसीम शेख, सलीम शेख, परवेज शेख, ताजू शेख, इमरान शेख, आशिष गुंडेटी, फिरोझ शेख राजू शेख आदी उपस्थित होते.