चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी सर्वच ठप्प पडले. याचा फटका एसटीलाही मोठ्या प्रमाणात बसला. लाॅकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून बंद असलेली एसटी सेवा पुन्हा प्रवाशांच्या सेवेत सुरू झाली असून ४२ फेऱ्या सध्या सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी एसटीच्या प्रत्येक फेरीनंतर धुलाई तसेच सॅनिटायझेशन केले जात आहे. त्यातच चालक, वाहक तसेच प्रवाशांनाही मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.
कोरोेनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली, त्यातच मृत्युदरही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. राज्य शासनाने काही जिल्ह्यांत शिथिलता दिली आहे. दरम्यान, चंद्रपूर एसटी महांमडळानेही प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा फेऱ्या सुरू केल्या आहेत. सध्या नागपूर, गडचांदूर, ब्रह्मपुरी, अहेरी, मूल, सिंदेवाही, कोरपना, राजुरा, चिमूर आदी ठिकाणी बस फेऱ्या सुरू आहेत. मात्र कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. रुग्णसंख्याही घटत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये एसटीला प्रवासी मिळतील, अशी आशा केली जात आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील एकूण बस -२४५
सध्या सुरू असलेल्या बस ४२
एकूण कर्मचारी -१५०५
वाहक- ३६८
चालक ५८२
बाॅक्स
नागपूर मार्गावर सर्वाधिक बस
लाॅकडाऊननंतर एसटीच्या काहीच फेऱ्या सुरू होत्या. मात्र आता हळूहळू फेऱ्या वाढविल्या जात आहेत. सद्य:स्थितीत ४२ फेऱ्या सुरू आहेत. यामध्ये चंद्रपूर-नागपूर सर्वाधिक फेऱ्या असून त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी, अहेरी, मूल, कोरपना, राजुरा, चिमूर, सिंदेवाही या ठिकाणी बस फेरी सुरू करण्यात आली आहे.
चंद्रपूर-नागपूरसाठी प्रवासी संख्या अधिक आहे. त्यामुळे बस रिकामी न्यावी किंवा आणावी लागत आहे. परिणामी होणारे नुकसान टाळता येत असल्यामुळे या रस्त्यावरून अधिक प्रमाणात बस सोडल्या जात आहेत.
बाॅक्स
प्रत्येक फेरीनंतर सॅनिटायझेशन
मागील वर्षभरामध्ये एसटी महामंडळाने कोरोना संकटात राज्यभरात अनेक चालक तसेच वाहकांना गमावले आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी प्रत्येक फेरी झाल्यानंतर एसटीची स्वच्छता केली जात असून सॅनिटायझेशनही केले जात आहे. सध्या प्रवाशांचा कमी प्रतिसाद असून सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. चालक तसेच वाहकांसह प्रवाशांनाही मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांनी मास्क घातले आहे, त्यांनाच एसटीमध्ये प्रवेश दिला जात आहे.
बाॅक्स
प्रवासी घरातच
मागील वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत आहे. अनेक जण घराबाहेर जाणे टाळत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे बसस्थानकामध्ये एसटी उभी राहत असली तरी प्रवासीच नसल्याची स्थितीही काही ठिकाणी बघायला मिळत आहे.
बाॅक्स
कोट
मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीसुद्धा लाॅकडाऊन करण्यात आला. परिणामी एसटीची सेवाही प्रभावित झाली. आता हळूहळू प्रवासी येत आहेत. मागील वर्षभरापासून एसटीचे मोठे नुकसान झाले. सध्या काही फेऱ्या सुरू झाल्यामुळे ड्यूटी पुन्हा सुरू झाली याचा आनंद आहे.
-एक चालक
कोट
लाॅकडाऊनमुळे एसटीचे मोठे नुकसान झाले. यासोबतच कर्मचाऱ्यांचे वेतनही अनियमित होत आहे. मात्र आता पुन्हा एसटी रस्त्यावर उतरत आहे. नेहमीप्रमाणे प्रवासीसुद्धा एसटीलाच प्राधान्य देतील, अशी आशा आहे.
-एक वाहक