बी. यू. बोडेर्वारचंद्रपूर : तुमच्यावर हमखास आयुर्वेदिक उपचार करतो, असे सांगून उमेशबाबा नावाच्या बाबाने एकाला काढा दिला. दिवसातून तीनवेळा तो पाण्यासोबत घ्यायचा असे सांगितले. संबंधित व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे हा काढा घेतला. मात्र व्याधी दूर होण्याऐवजी संपूर्ण अंगावर त्या काढ्याची रिऍक्शन होऊन फोड आल्याने ही व्यक्ती चांगलीच हादरली आहे. येथील नारेंदरसिंह घोतरा असे उमेशबाबाच्या दाव्याला बळी पडलेल्या इसमाचे नाव आहे.
राजुरा तालुक्यात अलीकडे परराज्यातील असे बोगस वैद्य फिरून लोकांच्या व्याधीवर उपचार करण्याचे सांगून हजारोने लुबाडत आहे. उमेशबाबा यातलाच एक आहे. तो मात्र कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील असल्याचे समजते. उमेशबाबा हा नारेंदरसिंह घोतरा यांच्या घरी आला. घोतरा हे मागील तीन वर्षांपासून आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना चालता येत नाही. तुमच्यावर उपचार करतो, तुम्ही ठीक व्हाल म्हणून आयुर्वेदिक पद्धतीने तयार करण्यात आलेला काढा उमेशबाबाने त्यांना दिला. दिवसातून तीन वेळा तो पाण्यासोबत घेण्यास सांगितले.
हा काढा घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी संपूर्ण अंगावर फोड आले. जवळपास शंभर-दीडशे फोड अंगावर आले. यामुळे भयभीत झालेल्या घोतरा यांनी उमेशबाबाने दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो प्रतिसादच देत नाही. अखेर रुग्णालयात जाऊन त्यांनी उपचार सुरू केला आहे. मोठ्या प्रमाणात रिऍक्शन झाल्यामुळे दहा दिवस लोटूनही अंगावरील फोड गेले नाहीत. या घटनेवरून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध वापरू नये, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. लहू कुळमेथे यांनी केले आहे.