नागभीड : तालुक्यात बोगस डॉक्टरांची फौज तयार झाली आहे. भोळ्याभाबड्या जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत ग्रामीण भागात या डॉक्टरांनी लूट चालविली आहे. तालुक्यात अशा डॉक्टरांची संख्या २५ असल्याची माहिती आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाची साथ असल्यामुळे अनेकजण शासकीय किंवा मोठ्या रूग्णालयांमध्ये येऊन उपचार करून घेण्यास कचरत आहेत. पॉझिटिव्ह येईन या भीतीने अनेकजण घरगुती उपाय करीत आहेत. नाही तर गावातीलच बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेत असल्याची माहिती आहे. लोकांच्या या अज्ञानाचा फायदा हे डॉक्टर उचलत असून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा फी उकळत आहेत. एखादेवेळेस रुग्णांच्या जीविताचे बरेवाईट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या तालुक्यातील ढोरपा, मौशी, बालापूर, पाहार्णी, तेलीमेंढा, विलम, म्हसली, कोर्धा, किरमिटी, गंगासागर हेटी, वाढोणा, गिरगाव, बोंड, मिंडाळा, पारडी(ठवरे), नवेगाव हुंडेश्वरी, गोवारपेठ, तळोधी, येनोली, नांदेड, पळसगाव, किटाळी आणि कोजबी या गावात या डॉक्टरांनी आपले चांगलेच प्रस्थ तयार केले असल्याची माहिती मिळाली आहे. यात उल्लेखनीय बाब अशी की, पाहार्णी येथे दोन, वाढोणा येथे तीन, गिरगाव येथे चार आणि तळोधी येथे दोन याप्रमाणे हे डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती आहे. सूत्राच्या माहितीनुसार या डॉक्टरांची शैक्षणिक अर्हता एआयसीएम, बीईएमएस, डीएनवायएस - एनडी, आरएमपीआयडी, डीएनएम असल्याचे समजते. एवढेच नाही तर यातील काहींचा नोंदणी क्रमांक उपलब्ध नाही. यातील तीन डॉक्टर ब्रम्हपुरी येथे वास्तव्य करून नागभीड तालुक्यातील काही गावात ही 'सेवा' देत आहे.
सूत्राच्या माहितीनुसार यातील काही डॉक्टरांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र एका पॅथीचे असले तरी वैद्यकीय सेवा दुसऱ्याच पॅथीने करीत असल्याची माहिती आहे. प्रशासनाने या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र कारवाईपूर्वीच ते सतर्क होतात, अशीही माहिती आहे.