सास्ती : चंद्रपूर- बल्लारपूर- बामणी या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. परंतु नागरिकांना चौपदरी रस्त्याच्या माध्यमातून दिलासा मिळाला. दरम्यान, या रस्त्याच्या बांधकामात रस्त्याच्या कडेला येणारी बरीच झाडे तोडल्या गेली. बल्लारपुरातील कलामंदिर परिसरात असलेले एका भल्यामोठ्या वृक्षाला जीवनदान मिळावे म्हणून बांधकाम कंपनीने त्याला मुळसकट बाहेर काढले. त्याची लागवड करून त्याला जीवदान देण्याचे ठरविले. मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक, लागवड न करता त्या वृक्षाला विसापूर टोलनाका परिसरात असेच ठेवून दिले. अथक प्रयत्न करूनही त्या वृक्षाला जीवनदान देण्यास कंत्राटदार कंपनी असमर्थ ठरली.शेती व उद्योगधंद्याच्या विस्तारासाठी तसेच सिंचन प्रकल्पासाठी व इतर विकास कामांसाठी जमिनीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जंगल नाहीसे होत असल्याचे दिसून येत आहे. विखुरलेल्या वृक्षराजी आजही पूर्वजांनी सातत्याने केलेल्या वृक्षसंवर्धनाची आठवण करून देतात. परंतु जुन्या मुल्यांचा आज ऱ्हास होत आहे. विविध उद्योगधंदे, कोळसा खाणी, तसेच मोठमोठ्या प्रकल्पाचे काम करताना झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. त्यामुळे निसगाचे संतुलन बिघडत चालले असल्याचे दिसून येत आहे. उद्योगांमुळे प्रदूषण वाढत आहे. त्याचाही परिणामी निसर्गावर होत आहे. विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जाते. परंतु त्या प्रमाणात त्याची लागवड केली जात नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रमही हाती घेतला. परंतु त्यातूनही काही सार्थक झाले नाही. अनेक ठिकाणी हा कार्यक्रम अयशस्वी ठरला आहे.चंद्रपूर- बल्लारपूर- बामणी दरम्यानच्या चौपदरी रस्ता बांधकामादरम्यानही अनेक मोठमोठी वृक्ष तोडावी लागली. मात्र कत्तल वृक्षांमुळे होणारे नुकसान भरुन काढण्याच्या दृष्टीकोनातून तोडलेल्या वृक्षापेक्षा जास्त वृक्षांची लागवड करणे महत्त्वाचे होते. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.या चौपदरी रस्ता बांधकामादरम्यान अनेक वृक्षांच्या कत्तलीत बल्लारपूर शहरातील कलामंदिर परिसरात असलेले वृक्षही तोडल्या गेले. परंतु त्या वृक्षाचे जतन करण्याचा हेतू ठेवून कंपनीने जेसीबीच्या सहाय्याने हा भलामोठा वृक्ष मुळासकट उपटून त्याची विसापूर परिसरात असलेल्या टोलनाक्यावर लागवड करण्याचे ठरविले. हा मोठा वृक्ष ट्रकवर लादून त्या ठिकाणी नेण्यात आला. वृक्षाला जीवनदान मिळेल, असे वाटले. परंतु कुठे घोडे अडले कुणास ठाऊक, त्या वृक्षाला तसेच ठेवून देण्यात आले. परंतु वृक्षाचे रोपण करण्याचे सौजन्य दाखविले नाही. (वार्ताहर)
‘त्या’ वृक्षाला अखेर जीवदान मिळालेच नाही
By admin | Published: April 10, 2015 12:57 AM