बल्लारपूर : येथील श्रेणी १ मधील पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असल्यामुळे या दवाखान्याच्या हद्दीत असलेल्या पाच गावांना त्रास सहन करावा लागत आहे. या आठवड्यात पडलेल्या पावसाने दवाखान्यात असलेले झाड व भिंतही पडली. या गोष्टी चार दिवसांपासून तसेच पडून आहे. याकडे मात्र जिल्हा परिषदेचे संवर्धन अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.
या पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत विसापूर, बामणी, दहेली, लावारी, केमतुकूम या पाच गावांतील जनावरांना वेळोवेळी औषधोपचार करण्यास मदत होते. सोमवारी एक ग्रामस्थ गायीच्या उपचारासाठी आले तर दवाखान्याचे मैदान पावसाच्या पाण्याने भरलेले होते. दवाखान्याची भिंत तुटली होती, झाडही पडले होते. ते बाहेरूनच परतले. तिथे चौकशी केली असता मुख्य डाॅक्टर नाही, फक्त एक सहायक, पशुवैद्यकीय विकास अधिकारी व एक ड्रेसर आहे. यामुळे जनावर किंवा इतर प्राणी घेऊन येणाऱ्यांना फार त्रास होतो, असे कळले. पशुवैद्यकीय दवाखान्यात पाच जागा आहेत, परंतु दोनच कार्यरत आहेत. दवाखाना खोलगट भागात असल्यामुळे दरवर्षी पावसात दवाखाना पाण्याने भरला असतो. इमारतही जीर्ण झालेली आहे. निवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. ही समस्या वरिष्ठांना माहीत असूनही अजूनपर्यंत सोडविण्यात आलेली नाही.