पालकमंत्र्यांचा सहभाग : चार कोटी वृक्षलागवड अभियानाची जनजागृतीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या पुढाकाराने १ ते ७ जुलै या कालावधीत चार कोटी वृक्षलागवड अभियान राबविले जात आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी शुक्रवारी वनविभागाच्यावतीने पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयापासून वृक्षदिंडीला सुरूवात झाली. महापौर संजय नरवणे, जि.प.अध्यक्ष नितीन गोंडाणे, विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच.वाकडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य वनसंरक्षक प्रकाश चव्हाण, रवींद्र वानखडे, सामाजिक वनिकरणचे उपवनसंरक्षक प्रदीप मसराम, उपवनसंरक्षक हेमंत मीेणा आदींच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडी इर्विन चौकाकडे मार्गस्थ झाली. वृक्षदिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. वृक्षदिंडीत ज्ञानमाता विद्यालय, शिवाजी विद्यालय, आरडीआयके महाविद्यालय बडनेरा, मणिबाई गुजराती शाळा, शासकीय तंत्रनिकतेनचे विद्यार्थी सहभागी झाले होते. बसस्थानक चौक, पोलीस पेट्रोल पंप, गर्ल्स हायस्कूल चौक आदी मार्गांनी बचतभवनाजवळ दिंडीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग होता. रॅलीमध्ये विविध घोषणा देऊन वृक्षारोपणासंदर्भात जनजागृती करण्यात आली. सहभागी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. पालकमंत्र्यांनी दिंडीतून केला वृक्षसंवर्धनाचा जागर पालकमंत्री प्रवीण पोटे हे वृक्षदिंडीत इर्विन चौकात सहभागी झालेत. यावेळी पालकमंत्र्यांनी दिंडी खांद्यावर घेत नागरिकांचा व प्रशासनाचा उत्साह वाढविला. ‘चला वृक्षारोपण करू या, महाराष्ट्राचे भविष्य हरित करू या, ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी’ अशा घोषणा देत ही दिंडी पुढे रेल्वेस्थानक चौकात आणली. त्यानंतर आणखी नागरिक दिंडीत सहभागी झाले. ना. पोटे यांनी वृक्षसंवर्धनाचा जागर करुन वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले.
वृक्षदिंडीने अंबानगरी दुमदुमली
By admin | Published: July 01, 2017 12:11 AM