लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : तालुक्यातील करंजी येथील ग्रामपंचायतीने वीज तारांना अडसर ठरणाऱ्या वृक्षांची तोड करण्याचा ठराव पारित केला होता. मात्र वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने झाडाची फांदी छाटणे सोडून इतर खासगी जागेवरील जुन्या वृक्षांची कत्तल केल्याचा प्रताप समोर आला असून यासंबंधी जागा मालकाने पोलिसात तक्रार दिली आहे.ग्रामपंचायत करंजी अंतर्गत पाण्याच्या टाकीजवळील काही वृक्षांची वाढलेली फांदी पाहून वीज प्रवाहित करणाऱ्या तारांना स्पर्श होत असल्याचे निदर्शनास आले. यावरून ग्रामपंचायतीने विद्युत प्रवाह तारांना अडसर ठरणाऱ्या वृक्ष फांद्या हे तोडण्याबाबत ठराव पारित करून वीज वितरण कंपनीकडे सूचना दिल्या. मात्र वीज वितरण कंपनीचे लाईनमन शेडमाके यांनी करंजी येथीलच तुकेश पत्रुजी वानोडे यांच्या खासगी जागा सर्वे नंबर ९६३ मधील अंदाजे २५ ते ३० वर्षापासून सजीव सीसम जातीच्या चार वृक्षांची बुडापासून कत्तल करण्यात आली. तर एक झाड अर्धवट कापून ठेवण्यात आले. यामुळे तुकेश वानोडे यांचे लाखोंचे नुकसान झालेले असून त्यांनी याबाबत ग्रामपंचायत व वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने अन्यायग्रस्त वानोडे यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशन गाठून यासंदर्भात ग्रामपंचायत करंजी, सहाय्यक अभियंता वीज वितरण कार्यालय गोंडपिपरी तसेच लाईनमन व इतर दोन यांच्यावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याबाबतची लेखी तक्रार पोलिसात केली. या घटनेचा गोंडपिपरी पोलीस तपास सुरू आहे.