चंद्रपूर : आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा, वेदनांचे गोंदण आहे. नक्षलवाद ही त्या गोंदणावरील चुकलेली रेषा आहे. पोलीस व नक्षलवादी यांच्या चकमकीत मरणारा आदिवासीच असतो. ही सामाजिक आत्मभान देणारी बाब सर्व आदिवासी लेखक कवींनी विसरता कामा नये, असे प्रतिपादन डॉ. राजन जयस्वाल यांनी केले. स्थानिक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात शनिवारी अशोक तुमराम यांच्या ‘मी, गिरिकन्या आणि रानपाखरं..’ या कविता संग्रहाचे प्रकाशन डॉ. राजन जयस्वाल यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रसेनजीत गायकवाड होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.श्रीकांत पाटील, प्रा. डॉ. शाम मोहरकर उपस्थितीत होते.कविता संग्रहाचे मूल्यमापन करताना प्रा. श्रीकांत पाटील म्हणाले, तुमराम यांच्या कविता लयबद्ध व साकार शब्दरूप घेऊन अवतीर्ण झाल्या आहेत. हे त्यांच्या कवितेचे पुढील पाऊल आहे, असे सांगितले. डॉ. शाम मोहरकर यांनी आदिवासी साहित्य हे आजचे नाही तर शतकांपासून बोलीभाषेतील गाणी किंवा सांस्कृतिक लेणे झिरपत आजपर्यंत आले आहे. ती संस्कृती, आजच्या वास्तवातील व्यथा व वेदना नवशिक्षित तरुण व तरुणी आपल्या साहित्यातून मांडू लागलेत. या सर्व साहित्याला मराठी वाङमयाचे निकष लावावे लागतील. अलीकडील आदिवासी साहित्य मराठी भाषेचाच वापर करून लिहिले जात आहे, असे सांगितले.प्रसेनजीत गायकवाड यांनी, आधुनिक काव्यात आंबेडकरी विचारांचे प्रतिबिंब पहावयास मिळते. आंबेडकरी विचारांमुळेच अलीकडील लेखक व कवी लिहू लागले आहेत. त्यांची अंत:प्रेरणा आंबेडकरी विचारधारेने संपृक्त आहे. यासाठी नामदेव ढसाळांपासून ते तुमराम यांच्यापर्यंत दाखले देत, साहित्य चळवळ कशी फोफावत गेली हे उलगडून सांगितले.यावेळी तुमराम यांच्या काही कवितांवर संगीतमय कार्यक्रम कासलीकर व संच यांनी सादर केला. अशोक तुमराम यांनी कवितासंग्रहाची पार्श्वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रोहिणी निले यांनी केले. तर जमुना तुमराम यांनी आभार प्रदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)
आदिवासी साहित्य हे त्यांच्या व्यथा व वेदनांचे गोंदण
By admin | Published: December 29, 2014 11:39 PM