भद्रावती : तालुक्यातील कोंढा या गावातील आदिवासी महिलांना एका महिलेने आपण ग्रामसेवक असल्याचे सांगून घरगुती शिलाई मशीन, फॉल मशीन, छतावरील टिनपत्रे आदी वस्तू पंचायत समितीमार्फत मोफत मिळून देतो असे सांगून तब्बल आठ महिलांकडून ११ हजार ५०० रुपये घेतले. मात्र फसवणुकीचा प्रकार समोर येताच तोतया महिला ग्रामसेविकेला भद्रावती पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.सुचिता वसंत नागपुरे ऊर्फ संगीता वसंता बोरकर (२५) रा. मुकुटबन ता. वणी असे आरोपी महिलेचे नाव आहे. या महिलेने कोंढा गावाला भेट देवून आपण कावडी गावची ग्रामसेवक आहे असे भासवून आधारकार्ड असलेल्या गावच्या नागरिकांच्या सर्व्हे करायचा, त्यासाठी आपण आधारकार्ड नंबर व रेशन कार्डची झेरॉक्स प्रत आपणाला द्यावी लागेल, असे सांगून येथील काही महिलांना विश्वासात घेतले. आपण ग्रामसेवक असून पंचायत समिती भद्रावतीमध्ये आदिवासी गरजू महिलाकरीता पिको फॉल, शिलाई मशीन, लोखंडी टिनपत्रे इत्यादी साहित्य आपणास मोफत मिळणार. त्याकरीता शिलाई मशीनसाठी ७०० रुपये, फॉल मशीनसाठी ८००, लोखंडी टिनासाठी १ हजार रुपये आपल्याला पैसे द्यावे लागेल, असे सांगून येथील सुनिता चिकटे, लिला कुरेकर, सोनाबाई चिकटे, वैशाली चिकटे, मनिषा शिडाम, भावना देठे, सुनिता राजुरकर, वनिता घोरपडे अशा आठ महिलांकडून पैसे घेतले. मात्र तब्बल २० दिवस लोटूनही घरी वस्तू न आल्याने सुनिता नागपुरे या तिच्या पत्त्यावर काही महिलांसोबत जाऊन विचारपूस केली असता कोणीही महिला नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. यावरुन आपली फसगत झाल्याचे महिलांना समजले. त्यांनी लगेच भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली. फसगत करणारी महिला वणी बसस्थानकावर सापडली. तिचे खरे नाव संगीता वसंत बोरकर आहे. तिच्यावर ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आदिवासी महिलांना गंडविले
By admin | Published: May 24, 2015 1:56 AM