मीट द प्रेस : सीईओ सलील यांची माहितीचंद्रपूर : उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना क्षेत्र मर्यादित होते. आता जिल्हा परिषदेत अनेक विभाग आहेत. ग्रामीण भागातील नाळ या संस्थेशी जुळून आहे. त्यामुळे या मिनी मंत्रालयाच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचा आपला प्रयत्न आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलील यांनी स्पष्ट केले.चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज शनिवारी पत्रकार संघाच्या सभागृहात सीईओ आशुतोष सलील यांची मीट द प्रेस आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर, सचिव मंगेश खाटिक उपस्थित होते.यावेळी आशुतोष सलील पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातच उपविभागीय अधिकारी म्हणून काम करीत असताना आपण आपल्या कामात पारदर्शकता ठेवली होती. आता सीईओ म्हणून जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. जिल्हा परिषदेत येणाऱ्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. एखाद्याची आपणाकडे तक्रारी आली की ती मी नोंद करून घेतो. त्यानंतर संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांशी त्या तक्रारीसंदर्भात चर्चा करतो. याशिवाय आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी प्रत्येक विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्या विभागाचा आढावा घेतला जातो. जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. येथे प्रत्येक गोष्टीत पदाधिकाऱ्यांची भूमिका व त्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते. आपल्याला ज्या गतीने विकासकामे करायची आहेत, त्या गतीने जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला धावायला वेळ लागेल. तरीही आपल्याकडून यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. मात्र यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेमध्ये रुजू झाल्यापासून आपण काही विभागाकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीय केले आहे. त्यातील एक विभाग आरोग्य विभाग आहे. या विभागात अनेक समस्या आहेत.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांबाबत अनेक तक्रारी आहेत. त्या सोडविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केला जात आहे.यावेळी आशुतोष सलील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचीही समर्पक उत्तरे दिली. काम करताना स्वच्छ प्रतिमेचा फायदा होतो की तोटा, या प्रश्नावर त्यांनी फायदाच होत असल्याचे सांगितले. मात्र काम करताना प्रशंसा होते, तशी काही वेळा खरडपट्टीही काढली जाते, हेही आवर्जुन सांगितले. (शहर प्रतिनिधी)
मिनी मंत्रालयात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न
By admin | Published: July 12, 2014 11:34 PM