लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना माफक दरात शैक्षणिक सुविधा देण्याऐवजी यंदाच्या सत्रात अन्यायकारक शुल्कवाढ केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुल्कवाढ मागे घेतली नाही तर शेकडो विद्यार्थी अन्य विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यताही शैक्षणिक वर्तुळात वर्तविली जात आहे़चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील गोरगरीब व विद्यार्थ्यांना कमी खर्चात उच्चशिक्षण मिळावे, यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठात जिल्ह्यातील अनेक महाविद्यालये संलग्न आहेत. मागील तीन वर्षांपासून विद्यापीठात विविध शाखांचे नवीन अभ्यासक्रम सुरू झालेत. व्यावसायिक अभ्यासक्रमामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढू लागली. परंतु बदलत्या शैक्षणिक स्पर्धेत या विद्यापीठाला अजुनही स्वत:ची प्रतिमा उंचावता आली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी, या हेतूने प्रवेशशुल्क वाजवी ठेवून विविध योजना राबविणे गरजेचे आहे. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने यंदा प्रवेश शुल्कात मोठी वाढ केली. त्यामुळे शेतकरी व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या विद्यापीठात प्रवेश घेणे कठीण होणार आहे. मागील सत्रात बीए, बीकॉम, बीएसडब्ल्यू या अभ्यासक्रमासाठी ५ हजार ३०० रूपये प्रवेश शुल्क होते. यंदा ८ हजार ९२० रूपये भरावे लागणार आहेत. मास्टर आॅफ लेबर स्टडी एमए तसेच अन्य पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७ हजार ८०० रूपये शुल्क होते़ ते आता ११ हजार ४३३ रूपये करण्यात आले़ एमए मॉस कम्युनिकेशन या अभ्यासक्रमातही मोठी वाढ केल्याने विद्यार्थ्यांना यंदा आर्थिक समस्यांना तोंड द्यावा लागणार आहे़ शुल्क वाढीने पालकही नाराज झाले आहेत़जनसंवाद अभ्यासक्रम महागलाशहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी अन्य विद्याशाखांचा अभ्यास केल्यानंतर जनसंवाद अभ्यासक्रमाकडेही आकर्षित होत आहे. शासकीय व खासगी संस्थांमध्ये रोजगाराची संधी मिळत असल्याने हा अभ्यासक्रम करिअरसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. परंतु, यंदा गोंडवाना विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या प्रवेश शुल्कात मोठी वाढ केली़ मागील शैक्षणिक सत्रात आठ हजार ७०० रूपयात प्रवेश दिला जात होता़ यंदा १९ हजार ७५४ रूपये शुल्क निर्धारित करण्यात आले़ त्यामुळे या अभ्यासशाखेला विद्यार्थी मिळणे कठीण होणार आहे.राज्यपालांनी हस्तक्षेप करावाविद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याऐवजी गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने यंदा चुकीचे धोरण राबविणे सुरू केले. या विद्यापीठाला आधीच फारसे विद्यार्थी मिळत नाही़ तसेच राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत गोंडवाना विद्यापीठाचा दर्जा समाधानकारक नाही, असाही आरोप केला जातो़ त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे असे शुल्क धोरण निश्चित केले पाहिजे. परंतु, याकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले़ याचा आर्थिक फटका गरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे. राज्यपालांनी गोंडवाना विद्यापीठातील दरवाढ रद्द करावी आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी चंद्रपुरातील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत‘ शी बोलताना केली आहे़
गोंडवानाच्या शुल्कवाढीने गरीब विद्यार्थी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 11:12 PM
गोंडवाना विद्यापीठाने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना माफक दरात शैक्षणिक सुविधा देण्याऐवजी यंदाच्या सत्रात अन्यायकारक शुल्कवाढ केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुल्कवाढ मागे घेतली नाही तर शेकडो विद्यार्थी अन्य विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यताही शैक्षणिक वर्तुळात वर्तविली जात आहे़
ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये संताप : भरमसाठ फीवाढ रद्द करण्याची मागणी