शंकरपूर : येथील मंडळ अधिकारी यांनी रेती भरलेला हायवा ट्रक शंकरपूर बस स्थानकावर पकडला. परंतु त्यांची नजर चुकवून चालक रेती भरलेला हायवा ट्रक घेऊन पसार झाला. पुन्हा पाठलाग करून ट्रक अडविला असता. दरम्यान मंडळ अधिकाऱ्याचेच वाहन एका चारचाकी वाहनाने आलेल्या तस्करांनी अडवून धरल्याने पुन्हा चालक ट्रक घेऊन पसार झाला. ही सिनेस्टाईल घटना शनिवारी सकाळी ७ वाजता येथे घडली.
शंकरपूर येथील मंडळ अधिकारी डी. एल. बुराडे यांना एमएच ४० बीजी ५३३६ क्रमांकाचा हायवा ट्रक रेती घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. यानुसार बुराडे यांनी खैरी येथे सापळा रचला. त्यांनी चारचाकी वाहनाने पाठलाग करून शंकरपूर बसस्थानकाजवळ ट्रक अडवला. याची माहिती वरिष्ठ अधिकारी व शंकरपूर पाेलीस चौकीला देत असतानाच चालक ट्रक घेऊन भिसी मार्गाने पसार होऊ लागला. मंडळ अधिकाऱ्याने पुन्हा ट्रकचा पाठलाग केला असता आंबोलीजवळ रेती तस्करांच्या एका दुसऱ्या चारचाकी वाहनाने मंडळ अधिकाऱ्याचाच रस्ता अडवला. सुमारे १५ मिनिटे त्यांना अडवून ठेवले. तोपर्यंत ट्रक तेथून पसार झाला. त्या चारचाकी वाहनात तीन ते चार जण होते. संबंधित ट्रक आंबोली ग्रामपंचायत कार्यालयाजवळ रेतीखाली करून पुन्हा पसार झाला. अखेर रेती खाली केली त्या घटनास्थळाचा पंचनामा करून २१ हजार रुपयाला त्या रेतीचा लिलाव करण्यात आला. त्या हायवा ट्रक व चालकाला शोध सुरू आहे.
कोट
रेती भरलेला हायवा ट्रक शंकरपूर येथे पकडण्यात आला होता. परंतु नजर चुकवून तो ट्रक पसार झाला. त्याचा पाठलाग करीत असताना दुसऱ्या एक चारचाकी वाहन रस्त्याच्या मध्यभागी उभे करून १५ मिनिटे आपला रस्ता अडवला. तोपर्यंत रेती भरलेला ट्रक पसार झाला होता, असा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे.
- डी. एल. बुराडे, मंडळ अधिकारी, शंकरपूर.