ब्रह्मपुरी : शहराच्या मध्यवर्ती भागात २२ एकरवर खासगी बारई तलाव आहे. हा तलाव घेण्यासाठी अनेक राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले. हा तलाव एका आमदारांनी विकत घेतला आहे, असा सूर बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. आज शनिवारी सकाळी १० वाजताच्या अचानक जेसीबी आणून तलावाची पार फोडण्याचा प्रकार सुरू झाला. नागरिकांनी लगेच प्रशासनाला याबाबत सूचना देऊन पार फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडला. असे असले तरी बारई तलाव सध्या धोक्याच्या सावटात असल्याचे आजच्या प्रकारावरुन दिसून येत आहे.ब्रह्मपुरीच्या हृदयस्थळी २२ एकरमध्ये वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेला बारई तलाव आहे. शहरातील विद्यानगर, शेषनगर, देलनवाडी, गुजरीवॉर्ड या भागातील हजारो वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी याच तलावामधून पुरविले जात आहे. जर हा तलाव विक्रीला काढला व बुजविला तर ब्रह्मपुरीत पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई येणाऱ्या काळात निर्माण होऊ शकते. शासन ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत करोडो रुपये खर्च करते व येथे निसर्गत: निर्माण झालेला बारई तलाव विक्रीस काढला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नागरिकात प्रचंड असंतोष निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. यापूर्वी बरेचदा हा तलाव विक्रीस काढला गेला. परंतु त्यांचे प्रयत्न असफल झाले. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची भीषण टंचाई असताना तलावाची पार फोडण्याचा आज प्रकार घडून येताच नागरिकांमध्ये चांगलाच संताप व्यक्त होत होता. नागरिकांनी तात्काळ प्रशासनाला सूचना दिली. प्रशासनाने घटनास्थळ गाठून पार फोडण्याला प्रयत्न हाणून पाडला. परंतु ज्या राजकीय नेत्याने हा तलाव घेतला आहे. त्यांच्या पुढील कार्यवाहीला लगाम कोण लावेल, हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, यापुढे असा प्रकार घडू नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अन्यथा याविरोधान जनहित याचिका दाखल करून आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)शनिवारी झालेल्या प्रकारावर प्रतिक्रियातलाव कायम राहण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. तलाव अबाधित राखण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू. कोणी असा यानंतर प्रकार केल्यास फौजदारी कारवाई प्रशासनाने करावी.- अशोक भैय्या, उपाध्यक्ष नगरपालिका ब्रह्मपुरीतलाव खासगी आहे. तलाव विकणारे व घेणारे दोषी नसून नगरपालिका दोषी आहे. नगरपालिकेने भूमी अधिग्रहण कायद्यान्वये जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करून सरकारी दराप्रमाणे तलाव विकत घ्यावा व पाणी शहराला पुन्हा जास्त कसे मिळेल, याचा प्रयत्न करावा.- बंटी श्रीवास्तव, माजी उपाध्यक्ष न.प. ब्रह्मपुरीकाहीही झाले तरी तो तलाव आम्ही जाऊ देणार नाही. नगरपालिकेकडून त्या तलावावर कुठल्याही कामाची परवानगी देणार नाही. वेळप्रसंगी जनहित याचिका दाखल करण्यात येईल.- रिता उराडे, नगराध्यक्षा न.प. ब्रह्मपुरी
ब्रह्मपुरीचे हृदयस्थळ बारई तलाव फोडण्याचा प्रयत्न
By admin | Published: April 05, 2015 1:34 AM