राजकुमार चुनारकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चिमूर तालुक्यातील आमडी (बे) येथील अंगणवाडी केंद्रात मागील दोन-तीन दिवसांपासून हळदकुंकू लावून पूजा केलेले लिंबू कुणीतरी अज्ञात व्यक्ती टाकत आहे. शुक्रवारी अंगणवाडी सेविका, मदतनीस व गावकऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर या अंधश्रद्धेची सर्वत्र चर्चा झाल्याने पालकांनी अंगणवाडीतून पोषण आहार नेण्यास नकार दिला आहे. यामुळे अंगणवाडी सेविकापुढे पेच निर्माण झाला आहे. (Turmeric lemons are found at the door of Anganwadi Center! Parents refuse to take nutritious food)चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आमडी (बेगडे) गावाची लोकसंख्या दीड ते दोन हजार असून गावात सर्वच जाती धमार्चे नागरिक एकोप्याने राहतात. गावात माध्यमिक व प्राथमिक शाळेतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते तर दोन अंगणवाडी केंद्रातून बालकांवर संस्कार केले जातात. सध्या कोरोना काळ असल्याने अंगणवाडी केंद्रात बालकांना येण्यास बंदी आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रातून बालकांना तसेच गरोदर, स्तनदा मातांना पोषण आहार पुरविण्याचे कार्य अंगणवाडी सेविका व मदतनीसद्वारे केले जात आहे.
चार दिवसांपूर्वी सोमवारी सकाळी अंगणवाडी सेविका व मदतनीस केंद्रात आली असता त्यांना हळदकुंकू लावलेले लिंबू अंगणवाडी केंद्राच्या दरवाजात आढळून आले. हा प्रकार अंगणवाडी सेविकेने गावातील नागरिकांना, लाभार्थी मातांना प्रत्यक्ष दाखवला तर दुसऱ्यांदा शुक्रवारीसुद्धा असाच प्रकार अंगणवाडी केंद्राच्या दरवाजाजवळ घडला. या प्रकाराची माहिती पालकांना झाली. त्यामुळे आपल्या पाल्याना कुणी करणी तर करणार नाही ना, केवळ या अंधश्रद्धेपोटी पालकांनी पोषण आहार नेण्यास नकार दर्शविला आहे. या प्रकाराने अंगणवाडी सेविकांपुढे पेच निर्माण झाला आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व प्रशासनाने याबाबत गावकऱ्यांचे प्रबोधन करावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.--------------------------------सोमवारी सकाळी अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी उघडण्यास मदतनीस वैशाली गाठे आली असता दरवाजात हळदकुंकू लावलेले चार-पाच लिंबू आढळून आले. हा प्रकार गावक?्यांना सांगितला व परत शुक्रवारीसुध्दा असाच प्रकार घडला. याबाबतची माहिती अंगणवाडी सुपरवायझर यांना तोंडी दिली आहे-सरिता गोरवेअंगणवाडी सेविका आमडी बेगडे