जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : चंद्रपूर बचाव समितीची मागणीचंद्रपूर : कालबाह्य झालेले, कमी उंचीचे, धूळ व राख पसरविणारे थर्मल पॉवर स्टेशनचे युनिट क्रमांक १ व २ बंद करावे, अशी मागणी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, महासचिव मधुसूदन रुंगठा, सदानंंद खत्री, सुहास अलमस्त, चंद्रशेखर नंदनवार, सुबोध कासलकर, अॅड. शाकीर मलिक, रोडमल गहलोत, धांडे, पराग खंडालकर आदी उपस्थित होते.निवेदनामध्ये इरई , झरपट नदी व मोठे नाल्यांची त्वरित साफसफाई करण्यात यावी, नदीतील गाळ काढण्यात यावा, आॅटोरिक्षामध्ये व अन्य वाहनांमध्ये रॉकेलचा वापर सक्तीने थांबवून प्रदुषण कमी करावे, त्याचबरोबर सी.एन.जी. व बॅटरीवर चालणाऱ्या आॅटोंना व अन्य वाहनांना प्रोत्साहित करण्यात यावे, महानगरपालिकेने रेनवाटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन द्यावे, यासाठी जनजागृती करावी व त्यांना करात सूट द्यावी, आझाद बाग व रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण करावे, शहरातील ओपन स्पेसमध्ये झाडे लावावी यासाठी डब्ल्यूसीएल, सीटीपीएस, एमईएल, सिमेंट कंपन्यांची मदत घ्यावी, रामाळा तलावाला पांचदेऊळ, जटपुरा रस्त्यापासून एप्रोच रस्ता बनविण्यात यावा व रामाळा तलावाला सुशोभित करून अतिक्रमण काढण्यात यावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यासंदर्भात खासदर हंसराज अहिर यांनासुद्धा चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने निवेदन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व समस्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले. (नगर प्रतिनिधी)
थर्मल पॉवर स्टेशनचे युनिट १ व २ बंद करा
By admin | Published: June 16, 2014 11:27 PM