लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : गाववाड्यातील समाजाचा गाडा सुरळीत चालविण्याचे काम वर्षानुवर्षांपासून परंपरागत पद्धतीने बारा बलुतेदार करत असून, कोरोना महामारीच्या काळात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने बारा बलुतेदारांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करून मदत करण्याची मागणी भाजपचे जिल्हा ओबीसी महामंत्री संदीप पारखी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
लॉकडाऊन घोषित केले आणि यात सर्वसामान्य व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. यात काही अतिशय छोटे व्यावसायिक आहेत. त्यांचा दररोजचा संसाराचा गाडा हा याच व्यवसायाच्या भरोशावर असतो. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, बारा बलुतेदारांचे काम अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नसल्याने त्यांचा व्यवसाय बंद आहे. यात नाभिक, सुतार, कुंभार, शिंपी, परिटसह बारा पारंपरिक व्यापार करणाऱ्यांचे व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. लॉकडाऊन जाहीर करताना सरकारने ऑटोरिक्षा चालक, बांधकाम मजूर, फेरीवाले इत्यादींकरिता आर्थिक सहाय्य जाहीर केले. परंतु, नाभिक, सुतार, शिंपी, कुंभार, परिटसह बारा बलुतेदारांसाठी कुठलीही आर्थिक मदत जाहीर केली नाही.
लॉकडाऊन काळात वीजबिल भरणा करणे, दुकानाचे भाडे देणे, दैनंदिन उपयोगी व पोट भरण्यासाठी आवश्यक वस्तू खरेदी करणे यासह अन्य खर्च करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असून, हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची अवस्था कार्यालयामध्ये बसून काम करणाऱ्यांना कळणार नाही. त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून बलुतेदारांमधील परंपरागत व्यावसायिकांना प्रतिकुटुंब किमान पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची मागणी भाजपचे जिल्हा ओबीसी महामंत्री संदीप पारखी यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.