विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
घनश्याम नवघडे
नागभीड : तालुक्यात पीक विमा कंपन्यांनी पीक विम्यापोटी एक कोटी ७३ लाख ४० हजार ७९२ रुपये मदतीची यादी जाहीर केली आहे. वरकरणी आकडा मोठा वाटत असला तरी या रकमेत आठ हजार ५८८ लाभार्थी आहेत आणि हेक्टरी १ हजार १७६ रुपये याप्रमाणेच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. एकंदर पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली, अशा प्रतिक्रिया यासंदर्भात व्यक्त होत आहेत.
मागील वर्षीच्या हंगामात अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी तालुक्यातील धान पीक पुरते नेस्तनाबूत झाले. प्रत्येक गावातील जाहीर करण्यात आलेली शासकीय पैसेवारीही ५० टक्क्यांच्या आत आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी पीक विम्याची मागणी केली होती. नागभीड तालुक्यात धानाचे एकमेव पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी २८ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रात हे पीक घेण्यात येते.
यावर्षी नागभीड तालुक्यात धानावर अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर मावा, तुडतुडा, करपा यासारख्या विविध रोगांनी धान पीक पार नेस्तनाबूत केले. आता मळणीनंतर दर एकरी पाचसहा पोती उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात आले असून या उत्पादनाने शेतकरी पार हादरून गेले आहेत. हे शेतकरी आता पीक विम्याची मागणी करीत होते. दरम्यान, नागभीड येथील तालुका कृषी कार्यालयास नुकतीच पीक विम्यास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे.
तालुक्यात पीक विमा कंपन्यांनी पीक विम्यापोटी तब्बल आठ हजार ५८८ शेतकऱ्यांसाठी केवळ एक कोटी ७३ लाख ४० हजार ७९२ रुपये मदतीची यादी जाहीर केली आहे. म्हणजेच हेक्टरी १ हजार १७६ रुपये याप्रमाणेच शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
बॉक्स
विम्याचा हप्ता एकरी ३५० रुपये
आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने पीक घेण्यासाठी शेतकरी गावातील सेवा सहकारी आणि आदिवासी विविध कार्यकारी संस्था या सोसायट्यांमार्फत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जाची उचल करीत असतात. हे कर्ज उचलत असताना कर्जाऊ रकमेतून जिल्हा मध्यवर्ती बँक पीक विम्याचा प्रती एकरी ३५० रुपये हप्ता कपात करून विमा कंपनीकडे हप्त्याची रक्कम जमा करीत असते. अशीच पद्धत इतर राष्ट्रीयीकृत बँकाही अवलंबत असतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच विचार करता ही बँक दरवर्षी सहा ते सात हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देत असल्याची माहिती आहे. काही शेतकरी वैयक्तिकरित्याही आपल्या शेतीचा पीक विमा काढत असतात. असेही शेतकरी शेकडोंच्या घरात आहेत.
कोट
पीक विमा योजनेसाठी आठ हजार ८५५ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांसाठी १ कोटी ७३ लाख ४० हजार ७९२ रुपये जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आली नाही.
- नागेश तावसकर,
तालुका कृषी अधिकारी, नागभीड