विकास खोब्रागडे, प्रकाश पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा बफर झोनअंतर्गत येणाऱ्या पळसगाव वनपरिक्षेत्रामधील पळसगावाला लागून असलेल्या झुडपात बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून दोन बछड्यांसह वाघिणीने चांगलाच धुमाकूळ घातला. यादरम्यान, वाघिणीला पिटाळण्यासाठी आलेल्या वन कर्मचाऱ्यांसह एका नागरिकालाही वाघिणीने हल्ला करून जखमी केले. जवळपास चार तास वाघीण आणि बछडे तिथेच होते. वाजंत्र्यांनी जोरजोरात ढोल-ताशे वाजविल्यामुळे एक बछडा गोंड मोहाळी गावाच्या तर एक बछडा जंगलाच्या दिशेने पळाला. वृत्त लिहीपर्यंत वाघीण त्याच परिसरात होती.
बुधवारी सकाळी रमेश मेश्राम हा तलावाशेजारी शाैचाकरिता गेला असता वाघिणीच्या बछड्याने त्याच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे त्याने धूम ठोकत गावाकडे धाव घेत गावकऱ्यांना माहिती दिली. गावकरी तिथे आले. यादरम्यान ढोल वाजविणाऱ्या चरणदास दादाजी बन्सोड (५५, रा. पळसगाव) याच्यावर वाघिणीने हल्ला करून जखमी केले. त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूरला रेफर करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी मोहुर्ले यांचा बैल याच वाघिणीने मारला होता. त्यामुळे वाघीण व तिचे दोन बछडे त्या ठिकाणी ठाण मांडून होते. वाघीण व तिचे बछडे गावाशेजारी असल्याची माहिती मिळताच नागरिकांची एकच गर्दी उसळली.
घटनेची माहिती मिळताच व्याघ्र कृती दलाच्या जाधव, पळसगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. ठेमस्कर, चिमूरचे पोलीस उपनिरीक्षक मोहड, वनपाल गेडाम, दांडेकर, वनरक्षक गेडाम व वनकर्मचारी यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
वाजंत्र्यांवर घातली झडप..
गर्दीवर नियंत्रण मिळवित वन कर्मचारी व पोलिसांनी ढोल-ताशे वाजवून वाघीण व बछड्यांना जंगलात पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक बछडा जंगलाच्या दिशेने व एक गोंड मोहाळी गावाच्या दिशेने पळाला. वाघीण मात्र तिथेच ठाण मांडून बसली होती. अचानक वाघिणीने पुन्हा वाजंत्र्यांवर झडप घातली. त्याने ढोल तेथे टाकून पळ काढल्याने वाजंत्री बचावला. त्यानंतर वाघीण तलावाच्या पाळीने पुढे गेली. वन कर्मचाऱ्यांनी तिचा पाठलाग केला. यावेळी वाघिणीने व्याघ्र कृती दलाचे वनरक्षक सुनील गज्जलवार यांना मानेवर पंजा मारून त्यांना तलावाच्या पाळी खाली खेचत नेले. मात्र, वेळीच बाकी कर्मचारी काठी घेऊन धावले व त्यांना वाघिणीच्या तावडीतून सोडविले. वृत्त लिहीपर्यंत वाघीण तलावाजवळच्या झाडाखालीच दडून होती. वनविभागाचे अधिकारी तिच्यावर लक्ष ठेवून आहेत.
कॅमेरे लावण्यास गावकऱ्यांचा विरोध
घटनास्थळी वनविभागाने वाघीण व बछड्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरातील झाडांवर दहा कॅमेरे लावले होते. मात्र, याच परिसरात गावकरी शौचास येत असल्याने लावलेले कॅमेरे गावकऱ्यांनी मनाई करीत काढण्यास भाग पाडले. मात्र वनाधिकारी ठेमस्कर यांनी सरपंच यांच्याशी चर्चा करून परत परिसरात सायंकाळपर्यत वाघिणीच्या हालचाली टिपण्यासाठी दहा कॅमेरे लावले.
बुधवारी सायंकाळपर्यंत वाघीण जर जंगलाच्या दिशेने गेली नाही तर गावातीलच ग्राम सुरक्षा दल व वन कर्मचारी यांच्या माध्यमातून रात्री वाघिणीवर नजर ठेवण्यात येणार आहे. परिसरात दहा कॅमेरे लावण्यात आले आहेत.
-आर. एन. ठेमस्कर,
वनपरिक्षेत्र अधिकारी पळसगाव.