लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी तब्बल पाच क्षेत्रांमध्ये भाजपचे आमदार निवडून आले. राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश आमदार मुंबईला गेले आहेत. मात्र, आता मंत्रिपदावरून जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. जिल्ह्याला यावेळी दोन मंत्रिपदे मिळतील, अशी आशा नागरिकांना आहे.
राज्यातील हेवीवेट नेते म्हणून ओळख असलेले आणि मागील सात वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले जिल्ह्यातील एकमेव नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागील टर्ममध्ये वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्रिपद तसेच ते जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा होते. दरम्यान, २०१४ मध्ये ते वित्तमंत्री होते. त्यामुळे यावेळी त्यांच्याकडे राज्यातील वजनदार मंत्रिपद राहील, असा विश्वास राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, विधानसभा सभागृहातील मागील अनेक वर्षांचा अनुभव बघता त्यांच्याकडे भाजपमधील वरिष्ठ नेते मोठी जबाबदारी देतील, अशीही चर्चा जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातून मागील तीन वेळा निवडून आलेले भाजपचे बंटी भांगडिया यांनाही यावेळी मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूरमध्ये भांगडिया यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. या क्षेत्राकडे पंतप्रधानांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे भांगडिया यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहे. या सहापैकी पाच विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे आमदार निवडून आले. या पाचजणांपैकी सुधीर मुनगंटीवार, बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार हे तिघे यापूर्वीही आमदार होते, तर राजुरा विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले देवराव भोंगळे आणि वरोरा क्षेत्रातून करण देवतळे हे दोघे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत.