चंद्रपूर : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती - धोपटाळा टाऊनशिप येथे आज(दि. २२) सकाळी ९ वाजता सांडपाणी व भूमिगत सिवरेज टाकी, गटर साफ करण्यासाठी आत गेलेले कंत्राटी कामगार व वेकोलि कामगार गॅसमुळे बेशुद्ध झाले. ही माहिती बाहेर असलेल्या कामगारांना मिळताच त्यांना तातडीने बल्लारपूर क्षेत्रीय दवाखान्यात नेण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, यापैकी दोन कंत्राटी कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी सुशील कोरडे याला नागपूर येथे भरती करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती - धोपटाळा टाऊनशिपमध्ये सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कंत्राटी कामगार दहा फूट खोल असलेली टँक साफ करण्यासाठी उतरले होते. बराच वेळ होऊनही ते न आल्याने आणि आवाज दिल्यानंतर कोणताही प्रतिसाद न दिल्याने कंपनीचा एक कर्मचारी टँकमध्ये उतरला. तोही वर न आल्याने व आवाजाला प्रतिसाद न दिल्याने वर असलेले कामगार घाबरले आणि त्यांनी शेजारच्या लोकांना माहिती दिली.
यानंतर तातडीने टँकवरील स्लॅप जेसीबीच्या सहाय्याने काढले. यावेळी तीन कंत्राटी कामगार व एक वेकोलि कामगार बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांना बाहेर काढण्यासाठी रामपूर ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी शंकर आंदगुला खाली उतरले आणि उपस्थितांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढले. जखमी मजुरांना रुग्णालयात नेले असता ५-७ मिनिटांनी शंकर आंदगुला हेही बेशुद्ध पडले. त्यांना वेकोलिच्या रुग्णालयातही नेण्यात आले.
एकूण पाच कामगार या दुर्घटनेत सापडले आहेत. यापैकी उपचारांना दाद न देता कंत्राटी राजू जंजर्ला व सुभाष खंडाळकर या दोघांचा मृत्यू झाला. वेकोलिचे कामगार सुशील कोरडे यांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. वेकोलि कर्मचारी प्रमोद वाभिटकर, रामपूर गावातील कंत्राटी सफाई कामगार शंकर आंदगुला यांचेवर उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत साखरे यांनी बंदोबस्त ठेवला असुन तपास सुरू आहे.
वेकोलीची सुरक्षितता चव्हाट्यावर
वेकोलीच्या कामात नेहमीच अपघात होत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत दुर्लक्ष केले जाते. कामगारांना यांचा नेहमीच त्रास सोसावा लागत असल्याची खंत कामगारांनी बोलून दाखवली. विशेष म्हणजे एवढी मोठी दुर्घटना घडूनही बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक यांचे कार्यालय काही मीटरच्या अंतरावर असतांना दुर्घटना स्थळावर अथवा दवाखान्यात एकाही वरीष्ठ अधिकाऱ्याने भेट दिली नाही. मात्र वेकोलिच्या कामगार संघटनांचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी आले आणि मदत कार्यात सहभाग घेतला. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर येथे दवाखान्यात भेट देऊन जखमीची माहिती घेतली.
दुर्घटनेतील पिडीतांना आर्थिक मदतीची मागणी
घटनेची माहिती मिळताच येथील शिवसेनेचे राजुरा विधानसभा समन्वयक बबन ऊरकुडे यांनी वेकोलीच्या रुग्णालयात भेट देऊन दुर्घटनेतील पिडीतांना आर्थिक मदतीची मागणी करीत वेकोलीच्या क्षेत्रीय रूग्णालयात उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने वेकोलिच्या कार्यप्रणाली वर आरोप करीत दोशिंवर कारवाई करण्याची मागणी केली.