वरोरा (चंद्रपूर) : संपूर्ण शहर नववर्षाचा उत्साह साजरा करत असताना वरोरा पोलिस स्टेशन हद्दीत वर्धा नदीच्या पात्रातील करंजी घाटामध्ये शासकीय नियमांना बगल देत अवैधरीत्या रेतीचे उत्खनन वरोरा तालुक्यातील करंजी घाटावरून सुरू होते. दरम्यान, वरोरा पोलिसांनी धाड टाकून तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने रेती तस्करी करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
या कारवाईत प्रकाश टोंगे, अनंता दाते, रामकृष्ण उके, बालाजी कुमरे, मारुती कोल्हे, दिलीप लांबट, प्रल्हाद वाघमारे, विवेक राऊत आदींविरुद्ध कलम ३७९, ५११, ४३०, ४३१, १८८ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करंजी घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. दरम्यान, नववर्षाला वर्धा नदीतील पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलून दोन पोकलेन मशिनद्वारे नदीपात्रातील रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनात करंजी घाटावर धाड टाकण्यात आली. यावेळी सहा हायवा ट्रकचे चालक घटनास्थळी वाहनांसह मिळून आले. पोलिसांनी दोन पोकलँड मशिन, सहा हायवा ट्रक, असा एकूण दोन कोटी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहायक पोलिस निरीक्षक नीलेश चौरे यांच्या तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी ट्रक चालकांव्यतिरिक्त कोणीही मुख्य आरोपी आढळून आले नाहीत. पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.
रेती तस्करी जोरात, कारवाईने तस्करांमध्ये दहशत
वरोरा परिसरात रेतीची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. दरम्यान, नववर्षालाच वरोरा पोलिसांनी रेती घाटावर धाड टाकून तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.