नवनियुक्त पोलीस शिपायांची चमू : पोलीस अधीक्षकांच्या नवप्रयोग चंद्रपूर : परंपरेतून पडलेल्या पाऊल वाटेवरून न चालता आपल्या संकल्पनेतून स्वत:ची नवीन वाट निर्माण करणारा नेहमी आपली एक वेगळी ओळख निर्माण करून जातो. याचा प्रत्यय पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या नव-नव प्रयोगातून चंद्रपूर पोलीस विभागास येत आहे. त्यांच्या अशाच एका प्रयोगातून केवळ दोन दिवसांत, तब्बल ११३ हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यास पोलीस विभागाला यश आले आहे. सामान्यत: पोलीस शिपाई प्रशिक्षणावरून परत आपल्या नियुक्तीच्या जिल्ह्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये लागलीच जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पुढील कर्तव्यपुर्तीकरिता त्यांची नियुक्ती केली जाते. परंतु या परंपरेला वळण देत संश्दिीप दिवाण यांनी याच नव्या जोशाचे, तळपदार अशा नव पोलीस शिपायांना एखाद्या पोलीस ठाण्यात कर्तव्यावर न पाठविता, त्यांच्या नव्या जोशाचा वेगळाच उपयोग करून घेतला.नव्याने पोलीस दाखल झालेल्या ७० तरुण पोलीस शिपायांना जिल्ह्यात नोंद असलेल्या हरवलेल्या इसमांना शोधून काढण्याचे उद्दिष्ट दिले. त्यांचे वेगवेगळे गट पाडून प्रत्येकी हरविलेले इसमाची नावे व फोटो त्यांना सोपविले. तसेच त्याबद्दल त्यांना प्रेरणा देऊन मार्गदर्शन केले व त्यावर देखरेख म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे. पगारे यांना नियुक्त केले. आज त्याचा परिणाम म्हणून केवळ दोन दिवसाच्या कालावधीत या नवीन पोलीस शिपायांनी जिल्ह्यातील हरविलेल्या इसमांपैकी एकूण ११३ व्यक्तींचा शोध लावला व त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सोपविले. त्या कुटुंबाचा आनंद पाहता या नवपोलीस शिपायांना आपण केलेल्या कार्याचे एक वेगळेच समाधान मिळाले. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी आपल्या कल्पनेतून हरवलेल्या इसमांना परत आणून त्यांच्या कुटुंबीयांना सोपवून ‘त्या’ कुटुंबालाच आनंद मिळवून दिला नाही तर त्यांनी पोलीस शिपायांमध्येसुद्धा कर्तव्याबद्दल एक नवचैतन्य निर्माण केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
दोन दिवसात लागला ११३ हरविलेल्या व्यक्तींचा शोध
By admin | Published: June 14, 2016 12:28 AM