लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन सांबरांचा मृत्यू झाला. सोमवारी चंद्रपूर-मूल महामार्गावरील डोणी गावाजवळ जानाळा बिटातील कक्ष क्रमांक ३५४ मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी सांबराचा तर बल्लारशाह वनविकास महामंडळाच्या डोपोमध्ये नर सांबराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.चंद्रपूर - मूल महामार्गावर वन्यप्राण्यांचा कॅरिडोर आहे. डोणी गावाजवळ रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सांबर जागीच ठार झाले. सदर सांबर मादी असल्याचे वविभागाचे म्हणणे आहे.
ही घटना सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास डोणी गावाजवळ घडली. वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वी. आय. पिंजारी, क्षेत्र सहाय्यक बी. एन. ढोले, वनरक्षक आर. जी. कुंभरे, प्राणीमित्र उमेशसिह झिरे घटनास्थळी भेट दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत सांबराचा पंचनामा करून शविच्छेदन करण्यात आले.
दुसरी घटना बल्लारशाह वन विकास महामंडळाच्या डेपोमध्ये घडली. नर सांबर(बारशिंग्या) मृतावस्थेत असल्याचे परिसरात फिरताना काही नागरिकांच्या लक्षात आले. ही माहिती मिळताच वन विकास महामंडळाचे आरएफओ रामकिसन कदम यांनी घटनास्थळ गाठले. सांबर सुमारे १० वर्षांचे असून त्याच्या मानेवर खोल जखम होती. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून सांबराला जाळण्यात आले.
मध्य चांदा वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले. वनविभाग या सांबराचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगत असले तरी पोस्टमार्टम अहवालानंतर नेमके कारण पुढे येईल, अशी माहिती वनविकास महामंडळ, बल्लारशाहचे वन परिक्षेत्राधिकारी रामकिसन कदम यांनी दिली. ही घटना वनविभागाच्या हद्दीतील असून ते आमच्या हद्दीत आणून टाकले, अशी चर्चा ऐकायला आली.