लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : मित्राला सोडण्यासाठी दुचाकीने टिबल सीट निघालेल्या दुचाकी वाहनाला कॅप्सूल ट्रॅकने मागून धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास घडली.संकेत झाडे (२४), अंकित मत्ते (दोघेही रा. सिदूर) अशी मृतकांची नावे आहेत. माथूरकर गंभीर जखमी असून, त्याला दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. तोदेखील सिदूर येथील रहिवासी आहे. ही घटना घडताच चिंचाळा व सिदूर येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने पडोली-घुग्घुस रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माहितीनुसार, घुग्घुसकडून कॅप्सूल ट्रक (क्रमांक एमएच ३४-एबी ८६७७) हा पडोलीकडे जात होता, तर सिदूर येथून हे तिघेही त्यातील एका मित्राला वडगाव येथे सोडण्यासाठी जात होते. दरम्यान, चिंचाळा वळणावर कॅप्सूल ट्रॅकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीस्वार संकेत झाडेचा जागीच मृत्यू झाला, तर अंकित मत्ते याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माथूरकर याच्यावर औषधोपचार सुरू आहे. घटनेची माहिती पडोली पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, संतप्त नागरिकांनी मृतकाच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत देण्याची मागणी करीत रास्तारोको केला. यादरम्यान पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पडोलीचे ठाणेदार कोंडावार यांनी लगेच दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. अखरे ट्रान्सपोर्ट व मृतकाचे हितचिंतक यांच्यात झालेल्या संयुक्त चर्चेत मृतक परिवारास दोन लाख तर जखमीला औषोधोपचाराचा खर्च देण्याचे मान्य केल्यानंतर आठ तास चाललेले रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.