कर्मचारी एकच : प्रवाशांची गोचीमाजरी : मध्य रेल्वे अंतर्गत भद्रावती तालुक्यात माजरी (जं.) स्थानकापासून जवळच दोन वेगवेगळ्या दिशेने धावणाऱ्या रेल्वे लाईनवर दोन ठिकाणी रेल्वे क्रासिंगवर दोन रेल्वे फाटक आहेत. या दोन फाटकाचे अंतर एक फर्लांग असून या दोन वेगवेगळ्या गेटवर रेल्वेचा एकच कर्मचारी कार्यरत राहतो. त्यामुळे रेल्वेलाईन ओलांडून जाणाऱ्या वाहनधारकांची मोठी गोची होत आहे.पहिला रेल्वे गेट माजरी (जं) ते वणी-नांदेडकडे जाणाऱ्या एकेरी रेल्वे लाईनवर आहे तर दुसरे गेट वर्धा-बल्लारपूर दुहेरी रेल्वे मार्गावर आहे. या दोन रेल्वे गेटचे अंतर एक फर्लांग असून या दोन रेल्वे गेटसाठी फक्त एका रेल्वे कर्मचाऱ्याची नियुक्ती आहे. यामुळे रस्ता ओलांडणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.२४ तासात शेकडो रेल्वे गाड्या या मार्गाने ये-जा करतात. यामुळे प्रत्येक वेळी रेल्वे गेट बंद करावे लागते. गाडी गेली किंवा वॅगनचे (मालवाहू गाडी) इतर बोगी, इंजिन आणि वॅगन जोडणे अथवा कमी करणे या कामासाठी रेल्वे गेट बंद केले जाते. दोन फाटकावर एकच कर्मचारी असल्याने रस्त्यावरील वाहनांच्या रांगा लागतात. या मार्गाने अन्य वाहनाद्वारे जाणाऱ्या प्रवाशांना फाटकावर तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते.कधी-कधी तर दोन्ही गेटला बंद करणे आणि गेट उघडणे यासाठी येथील कर्मचाऱ्याला मोठी कसरत करावी लागते. माजरी ते भद्रावती या रस्त्यावर हे दोन रेल्वे गेट असून या रस्त्याने वाहनाची २४ तास वर्दळ असते. वेकोलि व इतर कर्मचारी शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्णवाहिका, स्कूल बस, प्रवासी बस, शेतकरी वर्गाची शेती कामासाठी ये-जा सुरू असते. मात्र रेल्वे गेट बराच वेळ बंद असल्याने साऱ्यांनाच मोठी गैरसोय होत आहे. यापूर्वी या दोन रेल्वे गेटवर वेगवेगळे दोन कर्मचारी नियुक्त करावे किंवा रेल्वेच्या उड्डाण पुलाची सोय व्हावी, अशी वेळोवेळी मागणी झाली. मात्र यापैकी एकाही मागणीकडे गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप आहे. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे सल्लागार समिती व लोकप्रतिनिधी यांनी जातीने लक्ष देऊन या दोन रेल्वे गेटवरची समस्या सोडवावी अशी मागणी आहे.(वार्ताहर)
माजरी गावालगत रेल्वेचे दोन गेट
By admin | Published: November 08, 2015 1:19 AM