घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : रेती घाटांची मुदत संपल्याने आणि नवीन निविदा उघडण्यात न आल्याने सध्या रेतीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईचा मोठा फटका बांधकाम व्यवसायास बसत असून २०० घरकूल व ३६५ शौचालयांचे काम अडले आहे. एवढेच नाही तर या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो नागरिक रोजगारापासून वंचित झाले आहेत.बांधकामात रेती हा घटक महत्त्वाचा आहे. गेल्या काही वर्षांपासून मातीच्या घरांची निर्मिती बंद झाली आहे. माणूस कोणीही असो आपल्या कुवतीनुसार तो विटा सिमेंटचेच घर बांधतो. म्हणूनच गेल्या काही वर्षात रेतीची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. आणि यातून शासनाला करोडो रूपयांचा महसूलही प्राप्त होऊ लागले आहे. मात्र यावर्षी शासनाने रेती घाटांचा वेळेवर लिलाव न केल्याने रेतीची वाहतूक ठप्प झाली आहे. याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सर्व बांधकाम ठप्प झाल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो मजूर, शेकडो कंत्राटदार बेकारीचे जीवन जगत आहेत.सुत्राच्या माहितीनुसार, नागभीड तालुक्यात २०१६ -१७ या आर्थिक वर्षातील २८, २०१७ - १८ या आर्थिक वर्षातील ५० तर २०१८ - १९ या आर्थिक वर्षातील ८६ घरकुलांच्या कामांना रेती टंचाईचा फटका बसला असून रेतीअभावी ही कामे बंद असल्याची माहिती आहे. २०१७ - १८ मध्ये रमाई योजनेत मंजुरी मिळालेले ३६ घरकुलांची स्थिती अशीच आहे. घरकुलांप्रमाणेच नागभीड तालुक्यात शौचालयांची कामे बंद आहेत. जवळपास ३६५ शौचालयाचे काम रेतीअभावी बंद असल्याची माहिती आहे. याशिवाय अनेक ग्रा.प.भवन, रस्त्यांची कामे या रेती टंचाईच्या कचाट्यात सापडली आहेत. केवळ शासकीय कामेच नाही तर खासगी कामेही बंद पडली आहेत.शासनाने याकडे आता गांभीर्याने लक्ष द्यावे आणि रखडलेले रेती घाटांचे लिलाव तत्काळ करावे, अशी मागणी केली जात आहे.विटा व्यवसायात मंदीया रेती टंचाईचा फटका विटा व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. बांधकामेच नसल्याने विटांचा खप मंदावला आहे. परिणामी विटा व्यावसायिकांनी विटांचे उत्पादन कमी केले आहे. एका विटाभट्टीवर जवळपास १०० मजूर काम करतात. अशीच रेती टंचाई राहिली तर भविष्यात या मजुरांवर उपासमारीची पाळी येऊ शकते. नागभीड तालुक्यात शेकडोच्या घरात विटाभट्ट्या आहेत, हे विशेष.
दोनशे घरकूल, ३६५ शौचालयांचे काम अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:16 PM
रेती घाटांची मुदत संपल्याने आणि नवीन निविदा उघडण्यात न आल्याने सध्या रेतीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईचा मोठा फटका बांधकाम व्यवसायास बसत असून २०० घरकूल व ३६५ शौचालयांचे काम अडले आहे. एवढेच नाही तर या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो नागरिक रोजगारापासून वंचित झाले आहेत.
ठळक मुद्देरेतीची टंचाई : घाटांचे लिलावच नाही