सुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर जिल्ह्यात लावणार १५ लाखांवर वृक्षचंद्रपूर : राज्यात दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प यंदा घेतला आहे. हा सर्वानी यशस्वी करायचा आहे. याकडे इव्हेंट म्हणून न बघता संकल्प म्हणून बघा, असे आवाहन वनमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी केले.१ जुलै रोजी राज्य सरकारच्या माध्यामातून राज्यभर दोन कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प सरकारने आखला आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकुपाचे क्षेत्र संचालक जे.पी. गरड, महावितरण विभागाचे मुख्य व्यवस्थापक दिलीप घुगल, वनविकास महामंडळाचीे व्यवस्थापक डोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमाची माहिती देताना मुनगंटीवार म्हणाले, वनविभागाची या मोहिमेसंदर्भातील कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. वाटपासाठी दोन कोटी रोपे तयार आहेत. खड्डेही खोदून तयार आहेत. मात्र जेवढी रोपे लावली जातील, त्यातील किमान ८० ते ८५ टक्के जगविणे हे आता आपले सर्वांचे काम आणि जबाबदारी राहणार आहे.निसर्ग वाचला तर माणूस वाचेल, हे ओळखून वन आणि वृक्षांचे जतन करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. यासाठी केवळ वनविभागच नाही तर सर्व स्तरातील नागरिक, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याची गरज आहे. सैन्य दलाच्या इको बटालियनच्या माध्यामातूनही मोठया प्रमाणावर वृक्षलागवड होणार असल्याचे त्यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यात वनविभागाकडून १५ लाख ५५ हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती यावेळी ना. मुनगंटीवारांनी दिली. मध्य चांदा वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनीही या उपक्रमात असलेल्या सहभागाची माहिती दिली . ते म्हणाले, १५ लाख ५५ हजार वृक्षांची लागवड जिल्ह्यात केली जाणार आहे. वनविभागाने १० हजार, वनविकास महामंडळाने ७० हजार, सामाजिक वनिकरण विभागाने ७० हजार या सोबतच विविध सामाजिक संस्थांनीही रोपट्यांची मागणी केली असून त्यानुसार नियोजन केले आहे. वनविभागाच्या २२ रोपवाटिका असून त्यांनाही या उपक्रमाबाबत कळविले आहे. १ जुलैच्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी समित्या स्थापन केल्या असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदेल यांनीही उपक्रमाविषयी माहिती दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
दोन कोटी वृक्षलागवड हा इव्हेंट नव्हे तर संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2016 1:09 AM