लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या सितारामपेठ बिटमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याचे रविवारी उघडकीस आले आहे. दोन्ही बछड्यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून १० जून रोजी याच बिटमधील अशाच कुजलेल्या स्थितीत वाघिणीचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारामपेठ बिटातील जंगलात रविवारी सकाळी वन कर्मचाऱ्यांची गस्त सुरू असताना दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका ठिकाणी वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. काही अंतरावर पुन्हा एका बछड्याचा मृतदेह आढळला. अत्यंत कुजलेल्या स्थितीत हे मृतदेह होते. विशेष म्हणजे, याच बिटमध्ये चार दिवसांपूर्वी एका वाघिणीचा मृतदेह अशाच स्थितीत आढळला होता. वनकर्मचाऱ्यांनी लगेच याची माहिती वरिष्ठांना दिली. माहिती मिळताच ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र सहायक एन.आर. प्रवीण, विभागीय वनाधिकारी भागवत, वनाधिकारी येडे, मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मून, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. कडूकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने त्यांचा मृत्यू आठ दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. कडूकर यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर काही अवयव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती ताडोबाचे क्षेत्र सहायक एन.आर. प्रवीण यांनी दिली.वाघिणीसह दोन बछड्यांचा मृत्यू एकाचवेळी?चार दिवसांपूर्वी सितारामपेठ बिटमध्येच एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. तिच्या मृत्यू चार-पाच दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज तेव्हा वनाधिकाºयांनी वर्तविला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा दोन बछड्यांचा मृतदेह त्याच परिसरात आढळल्यामुळे वाघिणीसह या बछड्यांचा मृत्यू एकाचवेळी झाला असावा, अशीही शक्यता आहे.मृत्यू कशामुळे झाला हे अहवालानंतर होणार स्पष्टवाघिणीच्या मृत्यूनंतर तिचे काही अवयव प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल एक-दोन दिवसात येऊ शकतो. दरम्यान, रविवारी सदर दोन्ही बछड्यांचे अवयवही प्रयोगशाळेत पाठविले आहे. हे अहवाल आल्यानंतरच वाघिणीसह बछड्यांचा मृत्यू कसा झाला, हे स्पष्ट होईल.मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या सितारामपेठ बिटमध्ये वाघाच्या दोन बछड्यांचे कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळले आहेत. हे दोन्ही बछडे साधारण एक वर्ष वयाचे आहेत. चार दिवसांपूर्वी वाघिणीचा मृतदेहही याच परिसरात आढळला होता. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यू कशामुळे झाला, हे सांगता येईल.-एन.आर. प्रवीण,क्षेत्र सहायक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.
ताडोबाच्या बफर क्षेत्रात आणखी दोन बछड्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:23 PM
मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारामपेठ बिटातील जंगलात रविवारी सकाळी वन कर्मचाऱ्यांची गस्त सुरू असताना दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका ठिकाणी वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला.
ठळक मुद्देचार दिवसांपूर्वी वाघीण आढळली मृतावस्थेत