सावली, मूल (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात वाघ जणू ग्रामीण नागरिकांचा कर्दनकाळ बनल्याचे दिसत आहे. वाघाने आतापर्यंत अनेक निरपराधांच्या नरडीचा घोट घेत यमसदनी पाठविले. अशातच बुधवारी आणखी दोघांचा वाघाने बळी घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
एका घटनेत शौचास गेलेल्या एका इसमाला वाघाने ठार करून ८०० मीटरपर्यंत फरफटत नेले व ठार केले. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चकपिरंजी बिट क्रमांक ३९७ अंतर्गत येत असलेल्या रुद्रापूर येथे घडली. बाबूराव बुधाजी कांबळे (६०) असे मृतकाचे नाव असून तो रुद्रापूर येथील रहिवासी होता. वाघाने ठार केलेली एकाच आठवड्यातील दुसरी घटना असल्याने तालुक्यातील नागरिक भयभीत झालेले आहेत.
सावली तालुका हा जंगलव्याप्त तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील अनेक गावे ही जंगलालगत असल्याने हिंस्र पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुद्रापूर येथील बाबूराव हा गावालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळील उसेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर शौचाकरिता गेला होता. त्याच्याच पाठीमागे शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. घटनास्थळापासून जवळपास ८०० मीटरपर्यंत फरफटत नेले. ही घटना गावाला लागूनच असल्याने गावकऱ्यांनी आरडाओरड करीत वाघाच्या मागे धाव घेतली. गावकऱ्यांच्या आवाजाने वाघाने बोरकुटे यांच्या शेतातच मृतदेह सोडून पळ काढला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविला.
मूल तालुक्यात गुराख्याला केले ठार
मूल तालुक्यातील कांतापेठ येथील रेल्वेलाइन परिसरात बकऱ्या चारायला गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले व मृतदेहाला जवळपास दीड किमीपर्यंत फरफटत नेले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान चिरोली नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ७२० मध्ये घडली. देवराव लहानू सोपणकार (५५) रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या गुराख्याचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी कांतापेठ येथील शेतात काम करायला गेलेल्या महिलेवर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली होती. वारंवार घटना घडत असताना वनविभाग मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता योग्य पावले उचलत नसल्याने नागरिकांत रोष व्यक्त केला जात आहे.