१७ वाहने जप्त : नागपुरातून सुरू होता विक्रीचा व्यवहारचंद्रपूर : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे धाड टाकून दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक करीत त्यांच्या जवळून १७ मोटारसायकली जप्त केल्या. नागपूर येथील एक भामटा तळोधी येथील या दोघांच्या माध्यमातून अगदी कमी किमतीत मोटारसायकल विक्रीचा गोरखधंदा करीत असल्याची बाब तपासात निष्पन्न झाली आहे.तळोधी (बा.) येथील एक इसम त्याची आर्थिक क्षमता नसतानादेखील वेगवेगळ्या मोटारसायकल बाळगतो, अशी गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस शिपायी दीपक देशपांडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने तळोधी येथे जाऊन धाड टाकली. या कारवाईत तेथील एका इसम२ाकडून दोन तर बामणी येथील एका इसमाकडून एक मोटारसायकल पोलिसांनी जप्त करीत दोघांनाही अटक केली. या दोघांची चौकशी केली असता, त्यांनी तळोधी, मांगली, बामणी, नवखळा भागातील नागरिकांना अतिशय कमी किंमतीत १४ मोटारसायकल विकल्याची कबूली पोलिसांपुढे दिली. तसेच नागपूर येथील एक आरोपी मोटारसायकल चोरून त्या या दोघांच्या माध्यमातून विकत असल्याची बाबही चौकशीत पुढे आली आहे. या प्रकरणी अटकेतील आरोपीविरुद्ध कलम ४१ (१) (ड) अन्वये नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या आरोपींकडून चंद्रपूर व नागपूर शहरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकल मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. (प्रतिनिधी)
दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक
By admin | Published: December 08, 2015 12:49 AM