लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मनपाच्या कर वसुली विभागाने थकीत करधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी बँक आॅफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्रासह अन्य दोन दुकानांना सील ठोकले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ग्राहकांनी मोठ्या संख्येत कर भरावा म्हणून शास्तीत १००, ७५ व ५० टक्के सुट दिली होती. यानंतर कर भरण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने कर विभागाने जप्तीची मोहीम सुरू केली आहे. मनपाच्या झोन क्रमांक २ अंतर्गत भिवापूर वॉर्डातील मीना विजय करमरकर यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये बँकेचे ग्राहक सेवा केंद्र आहे. या मालमत्तेवर ५२ हजार ५४४ रुपये कर थकीत आहे. फेब्रुवारी महिन्यातच या केंद्राला सील ठोकण्यासाठी मनपाचे जप्ती पथक गेले होते. परंतु, मालमत्ताधारकाने थकीत रकमेचा धनादेश दिल्याने जप्तीची कारवाई टाळली होती. परंतु, मालमत्ताधारकाने दिलेला धनादेश बाऊन्स झाला. मागील वर्षीसुद्धा या मालमत्ताधारकाने खात्यात रक्कम नसलेल्या बँकेचे धनादेश देवून दिशाभूल केली होती. त्यामुळे यावेळी वसुली पथकाने थकीत कर रोखीने भरण्याचा सल्ला दिला. परंतु मालमत्ताधारकाने रोख रक्कम न दिल्याने अखेर ग्राहक सेवा केंद्राला सील ठोकण्यात आले. याचबरोबर अंचलेश्वर वॉर्डातील माधव कृष्णा चिटमलवार यांच्याकडे २९ हजार ३४३ रुपये कर थकीत आहे. चिटमलवार यांनाही कर विभागाने जप्ती नोटीस दिली होती. परंतु, जप्ती नोटीसनंतरही चिटमलवार यांनी कर भरला नाही. अखेरीस गुरुवारी मनपाचे पथक चिटमलवार यांच्या दुकानावर धडकले. यावेळी दुकनाला सील ठोकण्यात आले.ही कारवाई झोन अधिकारी नरेंद्र बोबाटे, अतिक्रमण प्रमुख नामदेव राऊत, अतुल पालेरपवार, रामदास चन्नुरवार, बंडू सहारे, भारत बिरिया यांच्या पथकाने केली.
ग्राहक सेवा केंद्रासह दोन दुकानाला ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:20 PM
मनपाच्या कर वसुली विभागाने थकीत करधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी बँक आॅफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्रासह अन्य दोन दुकानांना सील ठोकले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ठळक मुद्देमनपा करवसुली विभागाची कारवाई : थकीत कर भरा