नवरगाव : सिंदेवाही वनपरिक्षेञाअंतर्गत उपक्षेञ नवरगावमधील रत्नापूर बिटामध्ये काही व्यक्ती बाॅंब सदृश्य गोळ्याच्या सहाय्याने शिकार करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच वनविभागाने धाड टाकून शिकारीच्या साहित्यासह दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई मंगळवारला सायंकाळी करण्यात आली.
नवरगाव उपक्षेञामध्ये रत्नापूर बिटामध्ये तीन दिवसांपूर्वी ताटव्याची अवैध वाहतूक करताना ट्रॅकटर जप्त करण्यात आला होता. त्यामुळे वनाधिकारी यांनी जंगलात गस्त वाढवलेली असताना मंगळवारी सायंकाळी जंगली डुकराची शिकार करण्यासाठी काही व्यक्ती गेले, अशी गुप्त माहिती मिळताच क्षेत्रसहाय्यक सुनील बुल्ले यांनी वनरक्षकांना सोबत घेऊन रत्नापूर तलाव परिसरात धाड टाकली. सुंदरसिंग जुनी (४६) आणि करमसिंग जुनी (३२) रा. इंदिरा नगर रत्नापूर हे दोन्ही आरोपी डुकराची शिकार करण्यासाठी बाॅंब सदृश्य गोळे मांडत असताना रंगेहात अटक करण्यात आली. दोन्ही आरोपीविरूध्द वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय घटनास्थळावर १६ हातगोळे, जंगली डुकराचे दोन सुळे दात व इतर शिकारीसाठी लागणारे साहित्यसुध्दा जप्त करण्यात आले.
ही कारवाई क्षेत्रसहाय्यक सुनील बुल्ले यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक जे.एस. वैद्य, आर. यु. शेख, नितेश शहारे, दिवाकर गुरुनुले, राजेश्री नागोसे यांनी केली. पुढील तपास सुरू आहे. यापूर्वी या आरोपींनी तीन जंंगली डुकराची शिकार केल्याची माहिती वनविभागाला दिली.