चंद्रपूर : शासकीय कार्यात अनियमिततेचा ठपका ठेवून गोंडपिपरी तालुक्यातील दोन तलाठय़ांना आज २१ मे रोजी निलंबित करण्यात आले. यामुळे जिल्ह्याच्या महसूल विभागातील कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील तलाठी जी.पी. उईके आणि खराळपेठ येथील तलाठी व्ही.व्ही. रामटेके अशी या निलंबितांची नावे आहेत. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये लक्ष न देणे, नुकसानभरपाईच्या निधीचे वाटप योग्य न करणे, नागरिकांशी संपर्क न ठेवणे आदींचा ठपका या दोघांवरही ठेवण्यात आला आहे. निलंबनापूर्वी त्यांना कामात सुधारणा करण्याची तंबी देण्यात आली होती. मात्र काहीच परिणाम न दिल्याने अखेर गोंडपिपरी उपविभागीय कार्यालयाच्या अहवालावरून या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या कर्मचार्यांच्या निलंबनामुळे जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचारी धास्तावले आहेत. अलिकडच्या काळात कामातील अनियमिततेमुळे निलंबित झालेल्या या तलाठय़ांवरील कारवाईची ही पहिलीच वेळ आहे. या संदर्भात गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला. उपविभागीय स्तरावरील अहवालावरून ही कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय कर्मचार्यांनी जनतेच्या प्रश्नांना आधी प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी म्हैसेकर यांनी यापूर्वीच केले होते. जे कर्मचारी यात कुचराई करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे संकेतही त्यांनी आल्याआल्याच दिले होते. त्याची प्रचिती यावेळी घडली आहे. कुचराई करणार्या इतरांचीही दखल जिल्हा प्रशासन घेईल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
गोंडपिपरीतील दोन तलाठी निलंबित
By admin | Published: May 22, 2014 12:56 AM