बल्लारपूर (चंद्रपूर) : शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना प्रतिबंधित सुगंधित पान मसाल्याचे साहित्य घेऊन जाणारे दोन ट्रक चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील विसापूर टोल नाक्याजवळ अडवून ताब्यात घेतले. बल्लारपूर पोलिसांच्या सहकार्याने नागपूर व अमरावती येथील अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी रात्री ही कारवाई केली. याप्रकरणी चौघांना अटक करत त्यांच्याकडून मुद्देमालासह १ कोटी ११ लाख रुपयांचा सागर पान मसाल्याचा माल जप्त करण्यात आला. दोन्ही ट्रक कर्नाटक राज्यातील बिदर येथून नागपूरकडे सुगंधित तंबाखू घेऊन जात असल्याची बाब तपासात पुढे आली आहे.
चालक रवींद्र कमण्णा रा. धनुरा, ता. बसवकल्याण, जि. बिदर (कर्नाटक), चालक अनिल शरनेया रा. श्रीकतनल्ली जि. बिदर(कर्नाटक), क्लीनर शिवकुमार कत्तिमनी रा. धनुरा जि. बिदर, क्लीनर संतोष बलाथे रा. बिदर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्यांसह अजय कामनानी रा. नागपूर, दीपक कोठारी रा. बिदर, अरविंद मिश्रा रा. बिदर, सूर्यप्रकाश पांडे रा. बिदर, इस्माईल शेख रा. हैदराबाद, मुज्जमील रहमान ऊर्फ जामील रा. हैदराबाद, वाहन मालक सय्यद मुनवर रहेमान रा. राजेंद्रनगर तेलंगणा, गोस उदीन शेख दाऊद रा. रंगारेड्डी (तेलंगणा) अशा एकूण १२ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. आरोपींवरुद्ध बल्लारपूर पोलिस ठाण्यात अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ २६(१), २६(२)(१), २६(२)(४), सहवाचन कलम ३०(२)(१) भादंविच्या कलम १८८, २७३, आणि ३२८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आली आहे.
नागपूरचे सहायक आयुक्त (गुप्त वार्ता) आनंद महाजन, चंद्रपूरचे सहायक आयुक्त रोहनई शहा यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर ठाणेदार उमेश पाटील यांच्या सहकार्याने गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यदुराज दहातोंडे, राजेश यादव, संदीप सूर्यवंशी व चंद्रपूर अन्न सुरक्षा अधिकारी प्रफुल्ल टोपले, प्रवीण उमप, गिरीष सातकर यांनी विसापूर टोल नाका परिसरात सापळा रचून संयुक्तरीत्या कारवाई केली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन चंद्रपूरचे प्रफुल्ल टोपले यांनी बल्लारपूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेंद्र गायकवाड करीत आहेत.