चंद्रपूर : शिक्षण विभागाची परवानगी न घेता सुरू केलेल्या शाळेला अनधिकृत करण्यात येत असते. दरवर्षीच हंगाम सुरू होताना परवानगी न घेतलेल्या तसेच विविध त्रुटी असणाऱ्या शाळांना अनधिकृत घोषित केले जाते. यंदा चंद्रपूर जिल्ह्यातील दोन शाळांना अनधिकृत करण्यात आले आहे.
यामध्ये सावली तालुक्यातील पाथरी येथील अमरदीप इंग्लिश मीडियम स्कूल व चंद्रपूर येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे.शालेय शिक्षण विभागाच्या मान्यता प्रमाणपत्राशिवाय शाळा सुरू केल्यास किंवा शिक्षण विभागाने काही त्रुटी काढल्यास मान्यता काढून घेतल्यास शाळेला अनधिकृत केले जाते. या शाळेमध्ये प्रवेशाला बंदी असते. दरवर्षीच नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याच्या अनुषंगाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर करत असते. यंदा प्रसिद्ध झालेल्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील दोन शाळांचा समावेश आहे. या दोन्ही शाळा बंद करण्यात आल्या असून त्या शाळेच्या समोर तसे सूचना फलकही शिक्षण विभागाने लावले आहे.
"चंद्रपूर जिल्ह्यात दोन अनधिकृत शाळा आढळून आल्या. या शाळा बंद करण्याबाबत दोन्ही शाळेला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच शाळेच्या पुढे जाहीर सूचना फलकही लावण्यात आले आहेत."
-अश्विनी सोनवाने, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. चंद्रपूर