चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून सराईत दुचाकीचोराला जाळ्यात घेतले आहे. त्याच्याकडून विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्यात आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. नितीन नत्थूजी मारबते (२१) रा. जिजामाता चौक, नांदाफाटा, गडचांदूर असे या आरोपीचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडे वाहनांच्या चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. या चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खाडे यांनी एक पथक नेमून शोधमाेहिम राबविली. अशातच गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर रेल्वे स्थानक चौकात सापळा रचला. नितीन मारबते हा दुचाकीने जात असताना त्याला थांबवून चौकशी केली असता त्याच्या ताब्यात असलेली दुचाकी चोरीची असल्याचे लक्षात आले. ही गाडी ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. ती त्याने दोन महिन्यांपूर्वी नारंडाफाटा येथून चोरी केली असल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता त्याने तब्बल आठ दुचाकी चोरी केल्याचेही सांगितले. या चोरीच्या दुचाकी त्याच्याकडून बल्लारपूर रेल्वे स्थानक पार्किंग, यवतमाळ जिल्ह्यातील ढाकोली ता. शिरपूर येथून हस्तगत केल्या. या वाहनांबाबत गडचांदूर, चंद्रपूर रामनगर, चंद्रपूर शहर येथील सहा गुन्हे उघडकीस आले. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, उपपोलीस निरीक्षक सचीन गदादे व संदीप कापडे, पोलीस हवालदार संजय आतकुलवार , नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी, प्रांजल झिलपे यांचाही समावेश होता.
हस्तगत केलेल्या दुचाकी
एमएच ३४ एके १२०८, एमएच ३४ एजे १६०६, एमएच ३४ एके १०८७, एमएच ३४ बीएम ८१४६, एमएच ३४ एजे २४३९, एक विना क्रमांकाची काळ्या रंगाची निळा पट्टा असलेली हिरोहोंडा स्प्लेंडर, एच ३४ एई ४२२२ व एमएच ३४ एक्स ६४५५ या दुचाकी आरोपीकडून हस्तगत करण्यात आल्या आहे.