चंद्रपूर : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीस रामनगर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. अतुल विकास राणा (वय २४, रा. श्यामनगर, भगतसिंग चौक, चंद्रपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे अतुलवर चंद्रपूर शहर, रामनगर, दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
२६ मे रोजी रामू आनंदराव शेट्टी याने सिव्हिल लाईन येथील आपल्या घरासमोरून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. दरम्यान, रविवारी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना संशयित म्हणून अतुल राणा याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची विचारपूस केली असता, त्याने गाडी चोरल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून (एमएच ३४ बीजे २७३७) व (एमएच ३४ एआर ८३१०) क्रमांकाची दुचाकी जप्त केली. ही कारवाई रामनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार एच. एन. यादव, सपोनि अेकरे, सपोनि मलिक, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, पुरुषोत्तम चिकाटे, संजय चौधरी, किशोर वैरागडे आदींनी केली.