चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्याच्या उंबरठ्यावर येताच जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले. ही लाट थोपविण्यासाठी गर्दीला मास्क आणि सोशल डिस्टनसिंग अनिवार्य करतानाच विना मास्क दुचाकीस्वारांना चौकाचौकात अडवून २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. मात्र विनामास्क शहरात वावरणारी गर्दी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या नियमांना ठेंगा दाखवत आहे. या गर्दी कुणाचाही वॉच तर नाहीच, भुर्दंडही नाही. ऑटो व बसमधील विनामास्क प्रवाशीही दुर्लक्षित असल्याची धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये पुढे आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. लगेच मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्याला केवळ ५० नातेवाईकांनाच परवानगी आहे. याचे पालन न झाल्यास विवाह सोहळ्याचे आयोजक आणि मंगल कार्यालय संचालकावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात एका मंगल कार्यालयावर अशी दंडात्मक कार्यवाही देखील झाली आहे. मात्र कोरोनाच्या उद्रेकाची सर्वाधिक भीती सार्वजनिक ठिकाणी आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या चंद्रपूर महानगरासह तालुका मुख्यालय असलेल्या शहरातील बाजारपेठेत बिनदिक्कतपणे गर्दी वावरत आहे. सोशल डिस्टनसिंग तर दूरच साधे मास्कही लावलेले दिसून आले नाही. बसस्थानकावर बाहेर जिल्ह्यातील प्रवासी ये-जा करीत आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसले नाही. मात्र या ठिकाणी जिल्हा वा स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून आली नाही. ऑटोतूनही विना मास्क प्रवास सुरू आहे. इतकेच नव्हे तर कुणाच्याही चेहऱ्यावर कारवाईची भीतीसुद्धा नाही. केवळ दुचाकीने विना मास्क जाणाऱ्यांना प्रशासन टार्गेट करून असल्याची बाब निदर्शनास आली.
ग्राहकांसह दुकानदारही विनामास्क
शहरात विना मास्क लावून असंख्य लोक बिनदिक्कतपणे फिरताना आढळून आले. अनेक दुकानदारही विना मास्क होते. त्यांच्या समोर उभे असलेले ग्राहकही विनामास्क असल्याचे दिसून आले. कुणाच्याही चेरह्यावर कोरोनाची भीती जाणवत नव्हती.
प्रशासनाचा वचक कमी
शहरात फिरणाऱ्या नागरिकांमध्ये कोरानाबाबत गांभिर्य निर्माण करण्यात प्रशासन कमी पडत असल्याचा प्रत्यय ठिकठिकाणी आला. विना मास्कप्रकरणी केवळ दुचाकीस्वारांवर २०० रुपयांचा दंड ठोठावला जात होता.
बंगाली कॅम्प व जनता काॅलेज चौकातच दंड वसुल
मंगळवारी भल्या पहाटे पोलीस बंगाली कॅम्प व जनता काॅलेज चौकात उभे होते. सोबत २०० रुपयांची पावती फाडणारे एक-दोन कर्मचारी होते. ही कार्यवाहीही थातुरमातूरच होती. अनेकजण पोलिसांना ठेंगा दाखवून सुसाट निघून जात होते. पोलिसांसमोरून दुचाकीवर तीन जण बसून जात होते. डझनभर पोलीस असूनही अनेकजण विनामास्क जात होते.
कोरोनाचे सावट तरीही भीतीचा लवलेश नाही
चंद्रपूर जिल्ह्याच्या उंबरठ्यावर कोरोनाने दस्तक दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात केव्हाही उद्रेक होण्याची शक्यता आहे. मात्र नागिरकांमध्ये याबाबींची गांभिर्यता दिसून आली नाही. प्रशासनही कोरोना नियमाचा पाढा वाचून मोकेळे झाल्याचे चित्र चंद्रपूरसह जिल्ह्यात बघायला मिळाले.