प्रफुल्ल पटेल : सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादनचंद्रपूर : गेल्या दोन वर्षात केंद्र व राज्यातील सरकारने केवळ आश्वासनांशिवाय जनतेला काहीच दिले नाही. सर्वसामान्य माणसासाठी असणाऱ्या महत्वपूर्ण योजना बंद करणे आणि योजनांच्या नावात बदल करण्यापलिकडे या सरकारने दुसरे काहीच केले नाही. या दोन वर्षात राज्याची आणि देशाची या सरकारने दुर्दशा करुन टाकली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केंद्रीय महासचिव आणि नवनियुक्त राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी केली. राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल गुरूवारी स्थानिक मातोश्री सभागृहात त्यांचा जाहीर सत्कार व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, पक्षनिरीक्षक पांडूरंग ठाकरे उपस्थित होते.कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, दोन वर्षात शेतकरी, बेरोजगार, व्यापारी, महिला यापैकी कुणाच्याही जीवनात सुधारणा झाली नाही. धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना धान्यांचा दीडपट भाव देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले होते. त्याचे काहीच झाले नाही. जनधन खाते ठणठण खाते झाल्याची टीका त्यांनी केली. शासकीय योजना जवळपास बंदच केल्या. डिझेल व पेट्रोल भाव वाढविले. असे असतानाही ‘अच्छे दिन’ आल्याचे ते सांगत आहेत.स्वच्छ भारत अभियानावरही त्यांनी टीका केली. भाजपाच्या मंत्र्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप लक्षात घेतले तर, स्वच्छ भारत अभियानापेक्षा स्वच्छ भाजप अभियान राबविण्याची वेळ या पक्षावर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी अयशस्वी ठरली असून भ्रष्टाचाराला वाव मिळवून देण्याचा मार्ग झाला, असा गंभीर आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला. देशाला आणि राज्याला सत्तापरिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रवादी पक्ष सिद्ध झाला आहे. पक्ष बळकट करण्याची वेळ आता आली असून सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा संदेशही त्यांनी दिला. माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले, आपण अन्न पुरवठा मंत्री असताना गरिबांना स्वस्त दराने धान्य मिळावे यासाठी प्रयत्न केले. आपल्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना बी-बियाणे मोफत मिळायचे. कर्जमाफी मिळायची. मात्र या सरकारने सर्व योजना बंद पाडल्या. खतावरची सबसीडीही बंद पाडली. त्यामुळे जनतेला योग्य वेळी योग्य निर्णय घ्याचाच लागणार आहे. त्यासाठी पक्षकार्यकर्त्यांनी सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी खा. पटेल यांचा सत्कार करण्यात आला. सह्याद्री प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष दिलीप रिंगणे यांनी यावेळी पक्षामध्ये आपल्या सहकाऱ्यांसह प्रवेश घेतला. जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी प्रास्ताविक केले. मंचावर शहर अध्यक्ष शशीकांत देशकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला अध्यक्ष ज्योती रंगारी, शोभाताई पोटदुखे, दीपक जयस्वाल, अॅड. बाबासाहेब वासाडे, गयाचरण त्रीवेदी, माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, सुदर्शन निमकर, उद्धवराव शिंगाडे, अॅड. गोविंद भेंडारकर, सुरेश रामगुंडे, डी.के. आरीकर, हिराचंद बोरकुटे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
दोन वर्षांत राज्य व देशाची दुर्दशाच झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2016 1:05 AM